सांगली : जिल्ह्यात पूर्वापार चालत आलेली कला व कौशल्ये यांना प्रोत्साहन देऊन त्यांना देशातील मोठ्या तसेच परदेशी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाने *समर्थ योजना* आणली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील कारागिरांनी घ्यावा, असे प्रतिपादन भारत सरकारच्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत कोल्हापूर हस्तकला विभागाचे सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंग यांनी केले. ते सांगली जिल्ह्यातील पारंपारिक कला कौशल्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते.केंद्रीय जीएसटीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर अध्यक्षस्थानी होते.
चरक बहुद्देशीय संस्थेचे मनोहर चव्हाण यावेळी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रशेखर सिंग म्हणाले, केंद्र शासनाने पारंपारिक कारागीरांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. त्यात कारागिरांना प्रशिक्षण देणे, त्यासाठी विद्यावेतन देणे, त्यांच्या मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे , प्रदर्शनासाठी जाण्या-येण्याचा, राहण्याचा व प्रदर्शनाचा सर्व खर्च उचलणे , अवजारे देणे किंवा अवजारांसाठी अनुदान देणे अशा विविध बाबींचा समावेश आहे. या माध्यमातून कारागिरांना समर्थ बनवून त्यांना उद्योजक करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील कारागिरांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री.सिंग यांनी केले.
जीएसटीचे निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी सांगितले, केंद्र शासनाची समर्थ ही महत्वाकांक्षी योजना असून पारंपारिक कारागीर देशाच्या किंवा देशाबाहेरील बाजारपेठेत आपले कौशल्य व वस्तू पाठवून आर्थिक दृष्टया सक्षम होऊ शकतात . यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका ही सुविधाकर्त्यांची असून, त्यांच्या सहकार्याचा लाभ घेऊन कारागिरांनी आपली सर्वांगीण प्रगती साधावी, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी बोलतांना मनोहर चव्हाण यांनी आतापर्यंत जिल्ह्यात घेतलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचा आढावा घेतला.यावेळी दोन महिने प्रशिक्षण घेतलेल्या महिला कारागिरांना प्रमाणपत्रांचे वितरण श्री.सिंग, श्री.मेढेकर, श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे संयोजन सौ आलमआरा मुजावर यांनी केले .यावेळी स्नेहजित प्रतिष्ठानचे सचिव स्नेहल गौंडाजे उपस्थित होते.
सांगली- केंद्र सरकारच्या पारंपारिक कलाविकास अंतर्गत समर्थ योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करताना राजेंद्र मेढेकर. शेजारी मनोहर चव्हाण, चंद्रशेखर सिंग, आलमआरा मुजावर.