माडग्याळ : कर्नाटक शासनाने गुडापूर ता. जत येथे कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांची सोय व्हावी म्हणून
सन २००८ साली दोन एकर जागा खरेदी केली होती. त्याजागी कर्नाटक भवन व अत्याधुनिक अन्नक्षेत्रालय (दासोह भवन)बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्नाटकच्या मुजराई मंत्री व विजयनगरच्या पालकमंत्री सौ. शशीकला आण्णासाहेब जोल्ले यांच्या विषेश प्रयत्नातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून निर्माण होणारे दासोह भवन व कर्नाटक भवन या बाधकामाचा भूमिपूजन सोहळा सौ. शशीकला आण्णासाहेब जोल्ले यांच्या अमृत हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आ. विक्रमसिंह सावंत हे होते.
यावेळी सोलापूरचे खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी, सांगलीचे खा. संजयकाका पाटील, कुमार प्रसाद जोल्ले, कर्नाटकच्या धर्मादाय आयुक्त रोहीणी मॅडम, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सिध्दया स्वामी, संचालक चंद्रशेखर गोब्बी, संतोष पुजारी, मिमण्णा पुजारी, सदाशिव गुड्डोडगी, रोहन गाडवे, प्रकाश गणी,जिल्हा परिषद तम्मणगौडा रवी पाटील, गजानन कुलोळळी, उपसभापती विष्णू चव्हाण,सरपंच प्रसाद पुजारी, अशोक पुजारी, सरोजा जमदाडे, मलगोंडा पाटील,देवस्थान ट्रस्टचे सचिव विठ्ठल पुजारी यांच्यासह चिकोडी, एकसंबा गुडापूर परिसरातील भाविक उपस्थित होते.
कर्नाटक राज्याच्या मुजराई मंत्री व विजयनगरच्या पालकमंत्री सौ. शशीकला जोल्ले म्हणाल्या कि, गुड्डापूर येथील दान्नमादेवीचा कर्नाटकातील भाविकांवर कायमच कृपाशीर्वाद आहे. दान्नमादेवीचे मंदिर महाराष्ट्रात असले तरी मी मंत्रीपदाची शपथ घेताच गुड्डापूर येथील कर्नाटक भवन व अन्नक्षेत्रालयाचा विषय तातडीने मार्गी लावून पाच कोटीचा निधी माझ्या मुजराई खात्यामार्फत दिला आहे. त्याचे आज माझ्या हस्ते भुमिपुजन होताना मला मनस्वी आनंद झाला.खासदार संजयकाका पाटील म्हणाले, कर्नाटक सरकार गुहापूरच्या दान्नमादेवीच्या विकासासाठी मदत करत आहे.
मात्र महाराष्ट्र सरकार कडून म्हणावी तितकी मदत मिळताना दिसून येत नाही.महाराष्ट्राने विचार करण्याची निधी मंजूर गरज आहे. त्यासाठी आ. विक्रमसिंह सावंत यांनी शासनदरबारी प्रयत्न करावे असे आवाहन केले व केंद्र सरकारच्या माध्यमातून मी व खा, जयसिध्देश्वर महास्वामीजी मिळून जो काही देवस्थानच्या विकासासाठी निधी मिळतो,तो निश्चित मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु.
आ.विक्रमसिंह सावंत म्हणाले की, कर्नाटक हद्दीपासून ते गुड्डापूरकडे येणारे सर्वच रस्त्याचे डांबरीकरण येत्या काही दिवसात पुर्ण होईल. गुड्डापूर येथे भाविकांना सुविधा उपलब्ध करून देताना देवस्थान कमिटीला काही मर्यादा येतात मात्र आम्ही सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करु.ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
देवस्थान ट्रस्टटचे अध्यक्ष सिध्यया हिरेमठ म्हणाले की, आम्ही २००८ साली दोन एकर जागा कर्नाटक शासनाला खरेदी करून दिली होती. मात्र त्याठिकाणी बांधकामासाठी कर्नाटक सरकारकडून निधी मिळत नव्हता. मात्र सौ. शशीकला जोल्ले यांनी जेव्हा कर्नाटकच्या मुजराई मंत्री (धर्मादाय मंत्री) म्हणून शपथ घेतली तेव्हा त्यानी अवघ्या बावीस दिवसात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना विनंती करून पाच कोटीचा निधी मंजूर केला, ज्यादा निधी लागलेस तोही निधी देण्याचे मान्य केले आहे. त्यांचे देवस्थान ट्रस्ट कायमच ऋणी राहील.