महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र भिमाशंकर येथे वाहनतळ सुविधा,भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचे नियोजन

0
3

पुणे : कोरोना कालावधीनंतर प्रथमच महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र भिमाशंकर येथे देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता असल्याने सोमवार व महाशिवरात्रीचा दिवस असे १ मार्चपर्यंत भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महाशिवरात्रीपूर्वी रस्त्याचे नवीन झालेले काम व देवस्थान विकास आराखड्यातील सुरू असलेल्यात कामांच्या पार्श्वभूमीवर ही व्यवस्था करण्यायत आली आहे. मोठी वाहने (टेम्पो, बस, मिनीबस इ.) हॉटेल शिवामृत येथे लावावीत. (अंतर ६ कि.मी.) वाहनतळ क्रमांक ४ येथे चारचाकी वाहने (अंतर ४ कि.मी.) आणि वाहनतळ क्र. ३ येथे चारचाकी वाहनांचे पार्कंग होईल. (अंतर २ कि.मी.) वाहनतळ क्र. २ येथे दोनचाकी वाहने उभी राहतील (अंतर १ कि.मी.)

वाहने लावलेल्या ठिकाणापासून एस.टी. महामंडळाच्या बसेसमधून महाद्वार (एस.टी.स्टॅड) पर्यंत भाविकांना ने-आण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी वाहनतळ ठिकाण सोडून इतरत्र बेशिस्तपणे वाहन पार्क केल्यास ते बाजूला करण्यासाठी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दोन क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री क्षेत्र भिमाशंकर येथे येणारे भाविकांना ध्वनीक्षेपकाद्वारे योग्य सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी ८ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

श्री क्षेत्र भिमाशंकर येथे साखळी चोर (चेन स्नॅचिंग) व पाकीटमार करणारे, छेडछाड करणारे इसम यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व चित्रीकरण करणारी पथक नेमण्यात आली असून कारवाईसाठी दिवसा व रात्रीसाठी साध्या वेशातील पथके नेमण्यात आली आहेत. अवैध दारू व भांग विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यांची पथके ठेवण्यात आली आहेत.

श्री क्षेत्र भिमाशंकर महाशिवरात्र यात्रा कालावधी दरम्यान भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी व व्यापक लोकहिताच्यादृष्टीने प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे. श्री क्षेत्र भिमाशंकर महाशिवरात्र यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर आणि घोडेगावचे पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here