सांगली : जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाद्वारे अटल भूजल योजनेची कार्यशाळा पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय सभागृह, कवठेमहांकाळ येथे नुकतीच संपन्न झाली. या तालुकास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आमदार सुमनताई पाटील यांनी भूजल पातळी वाढविण्यासाठी अटल भूजल योजनेच्या माध्यमातून गावांना संधी निर्माण झाल्याचे सांगितले. तसेच तालुक्यात अटल भूजल योजना प्रभावीपणे राबविण्याच्या व मार्च 2022 अखेर गावांचे जल सुरक्षा आराखडे पूर्ण करून सादर करण्याच्या सूचना केल्या. तसेच शेती व पाण्याशी संबंधित सर्व शासकीय विभाग, लोकप्रतिनिधी आणि अंमलबजावणी भागीदार संस्था यांनी एकत्र येऊन गावें पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण व सुरक्षित बनतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कवठेमहांकाळ येथे आयोजित अटल भूजल योजना कार्यशाळा कार्यक्रम प्रसंगी वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषीराज गोसकी, सहाय्यक भूवैज्ञानिक जयंत मिसाळ, कनिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे, जिल्हा परिषद सदस्य भगवान वाघमारे, जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्था वनराई पुणे चे संचालक श्री. धारिया, तालुकास्तरीय यंत्रणांचे अधिकारी, योजनेत समाविष्ट गावांचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आदि उपस्थीत होते.
अटल भूजल योजना देशातील 7 राज्यात राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील 13 जिल्ह्याचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 92 गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एकूण 43 गावांचा या योजनेत समावेश आहे. अटल भूजल योजनेत गावात पाणी बचतीच्या उपाययोजना सोबत जलसंधारण व भूजल पुनर्भरनासाठीची कामे करता येणार आहेत. ही कामे सर्व यंत्रणांच्या केंद्राच्या व राज्याच्या योजनांच्या अभिसरणाच्या माध्यमातून करायची आहेत. त्याद्वारे भूजलाची घसरण थांबविण्याचे काम लोकसहभागातून करावयाचे आहे. तसेच चालू वर्षासाठीचे गावांचे जल सुरक्षा आराखडे मार्च अखेर पर्यंत तयार करण्यात येणार आहेत.
या कार्यशाळेत जिल्हा परिषद सदस्य भगवान वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषीराज गोसकी यांनी जलसुरक्षा आराखडे बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले.