माध्यमक्षेत्रातील तंत्रज्ञानात होत असलेले बदल स्वीकारणे आवश्यक

0
9
पुणे : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माध्यमक्षेत्रात सतत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान येत आहे, त्यामध्ये सुधारणा होत आहेत. या सुधारणा आत्मसात करत आपल्या क्षमता वाढवल्यास शासकीय कामकाजाबरोबरच वैयक्तिक जीवनातही त्याचा आपल्याला फायदाच होईल, असा विश्वास मोबाईल पत्रकारिता क्षेत्रातील तज्ज्ञ समीर देसाई यांनी व्यक्त केला.
विभागीय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भ्रमणध्वनी पत्रकारिता’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, सातारा जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, माहिती अधिकारी सचिन गाढवे, प्रशिक्षक हेमंत जाधव आदी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, भ्रमणध्वनी हा तीसरा डोळा असून आपल्याला सभोवतालच्या घटनांची जाण असल्यास प्रभावीपणे छायाचित्रे, चित्रफीतीतून टिपून त्याचा पत्रकारितेसाठी चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकतो. विविध खासगी दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांनी ‘मोबाईल जर्नलिझम’साठी पत्रकारांना आधुनिक साधने उपलब्ध करुन दिली असून चित्रीकरण, मिक्सिंग, एडीटिंग, अपलोडिंग आदी काम भ्रमणध्वनीच्या माध्यमातून चालते अशी माहिती दिली.
मोबाईल जर्नलिझम हे पत्रकारितेतील भविष्य असल्याचे सांगून प्रशिक्षक श्री. देसाई आणि श्री. जाधव यांनी मोबाईल पत्रकारितेसाठी आवश्यक साहित्याची माहिती दिली. तसेच या साहित्याचा वापर, विविध मोबाईल ॲप, संकेतस्थळ, कॅमेरा हाताळणी, ध्वनीफीत, ध्वनीचित्रफीत रेकॉर्ड करताना, छायाचित्रे काढताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी पुणे विभागातील सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती तसेच भविष्यातील प्रसिद्धीच्या अनुषंगाने येणाऱ्या नियोजनाची माहिती उपसंचालक डॉ. पाटोदकर यांनी दिली.
माहिती उपसंचालक डॉ. पाटोदकर म्हणाले, कार्यालयीन कामकाजात संदेशवहनासाठी भ्रमनध्वनीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. मात्र, याच भ्रमणध्वनीचा बातमीसाठी छायाचित्रे आणि व्हिडिओ बनवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रभावी वापर करावा. दररोज नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आपल्या तांत्रिक क्षमता वाढवाव्यात. कार्यालयीन कामकाज सांभाळून विविध कौशल्य वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि त्या माध्यमातून आपली प्रगती साधावी. त्यासाठी कायम प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here