सांगली : पेठ-सांगली मार्गावर कसबे डिग्रज ते आष्टादरम्यान चाकूच्या धाकाने आठ ते दहा जणांच्या टोळीने पिता-पुत्राचे अपहरण करून लुटले. तब्बल पन्नास लाखांची मागणी करीत दोघांनाही मारहाण करत दमदाटी केली. कसबे डिग्रज येथून अपहरण केल्यानंतर त्यांच्या जवळील २२ हजार रुपये काढून घेऊन त्यांना इचलकरंजीजवळील माणकापूर येथे सोडण्यात आले. याप्रकरणी शिवाजी यशवंत ढोले (५२, काकाचीवाडी, बागणी, ता. वाळवा) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.पोलीसांनी यांचा कसून तपास करत २४ तासांच्या आत संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ढोले हे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुलगा पीयूषसह दुचाकीने कसबे डिग्रजहून आष्ट्याकडे निघाले होते. या दरम्यानच एक चारचाकी मोटारगाडी त्यांना ओव्हरटेक करत आडवी आली. त्यानंतर दुसरी चारचाकी मोटार गाडीही बाजूला येऊन थांबली. या वाहनातून आठ ते दहाजण खाली उतरले. त्यांनी ढोले पिता-पुत्रांच्या अंगावर गुलाल टाकला. ‘गुलाल कसला आहे ते सांगतो’ असे म्हणून पिता-पुत्रास मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर दोघांनाही जबरदस्तीने मोटारीत बसवले.
यानंतर ढोले यांच्या खिशातील २२ हजार रुपये काढून घेण्यात आले. दोघांना जिवंत सोडायचे असेल तर ५० लाख रुपये द्या, अशी धमकी दिली. यावर ढोले यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना माणकापूर येथे सोडून त्यांची दुचाकी परत केली. यानंतर दोघांनीही सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात आठ ते दहा जणांविरोधात फिर्याद दाखल केली. सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड पुढील तपास करत आहेत.