शिक्षक ते पाठ्यपुस्तक लेखक | आदर्श शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे यांचा थक्क करणारा प्रवास

0
मनमिळाऊ ,उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित असलेले  मच्छिंद्र ऐनापुरे यांचा शिक्षक ते पाठ्यपुस्तक लेखक असा प्रवास थक्क करणारा आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांनी डी.एड.पूर्ण करून जत तालुक्यातच शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांच्या विद्यार्थी सेवेची सुरुवात जून 1995 मध्ये उंटवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतून झाली. सुंदर अक्षरांची देणगी लाभलेल्या ऐनापुरे यांनी तिथल्या शाळेच्या भिंती बोलक्या करून टाकल्या.

 

 

अभ्यासक्रमाबरोबरच मुलांना गोष्टींमध्ये रमवुन त्यांना अवांतर वाचनाची गोडी लावली. त्यांचा तिथल्या रोजच्या परिपाठाचा फलक  लिहिण्याचा शिरस्ता होता. क्रीडास्पर्धा,वक्तृत्व,भाषण ,सांस्कृतिक स्पर्धांमध्ये आणि शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये अगदी जिल्हा स्तरापर्यंत मुले त्यांच्या प्रयत्नाने चमकली. त्यांच्या तिथल्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत आदर्श ग्रामीण शाळा, स्वच्छ सुंदर शाळा यासह अनेक पुरस्कार पटकावले.लोकवर्गणीतून शाळेचे बाह्यरूप बदलून टाकले.

 

 

जत शहरातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा क्रमांक 3 ही शाळादेखील त्यांनी 2009 मध्ये सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत स्पर्धेत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आणून पारितोषिक खेचून आणले. शाळा परिसरात जी हिरवीगार झाडं आहेत ती श्री. ऐनापुरे यांच्या प्रयत्नांचा परिपाक आहे. मुलांचे अक्षर लेखन सुधारावे म्हणून त्यांनी जाईल त्या शाळेत अक्षर सुधार प्रकल्प राबवला आहे. शिष्यवृत्ती आणि विविध स्पर्धांमध्ये मुले चमकावीत यासाठी त्यांचे सतत प्रयत्न राहिले आहेत. शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेतही त्यांनी आपला सहभाग नोंदवून पारितोषिके पटकावली आहेत. गेल्या पंचवीस-सव्वीस वर्षात त्यांची उंटवाडी,जत क्र.3, अमृतवाडी, लमाणतांडा (निगडी बुद्रुक) येथील शाळांमध्ये सेवा झाली आहे.सध्या ते एकुंडी येथील शाळेत पात्र पदवीधर म्हणून कार्यरत आहेत.

 

एकीकडे शाळांमध्ये विद्यार्थी व शाळेची गुणवत्ता वाढवण्याचा ध्यास सुरू असताना त्यांनी  बालकथा व समाज सुधारणासंबंधी विविध लेखनाचा छंदही जोपासला आहे. आतापर्यंत त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर आणखी तीन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.यात व्यक्तिचित्रे,बालकथा आणि हास्यकथा, संपादकीय लेख, प्रेरणादायी लेखसंग्रह यांचा समावेश आहे. त्याचबरोबर किशोर, मुलांचे मासिक, केसरी-छावा, दैनिक दिव्यमराठीमधील किड्स कॉर्नरमध्ये त्यांचे सातत्याने लिखाण सुरू आहे. जवळपास ते वीस-पंचवीस वर्षांपासून लिखाण सुरू आहे.

 

गेल्या बारा वर्षांपासून ते ब्लॉग लेखन करीत आहेत. त्यात सुमारे दोन हजारांहून अधिक लेख वाचकांसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी लिहिलेले  ‘धाडसी कॅप्टन:राधिका मेनन’ हे व्यक्तिचित्रण बालभारती आठवीच्या पाठ्यपुस्तकात समावेशीत असून गेल्या पाच वर्षांपासून हा पाठ मुलांना अभ्यासाला उपलब्ध आहे. पाठ्यपुस्तकात समावेशीत झालेले ते जत तालुक्यातील पहिले लेखक आहेत. त्यामुळे जत तालुक्याला त्यांचा सार्थ अभिमान आहे. मराठी साहित्य सेवा मंचच्या माध्यमातून त्यांची अन्य साहित्यिक मित्रांच्या सोबतीने  जत तालुक्यात साहित्य चळवळ सुरू आहे. साहित्य संमेलने, कथा-काव्यलेखन कार्यशाळा, कवी संमेलने, पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहन अशी अनेक उपक्रमे जत तालुक्यात राबवली जातात.
सामाजिक सहभाग
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष, संघर्ष फाउंडेशन संचालक व मराठी साहित्य सेवा मंचचे माजी अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य म्हणून श्री. मच्छिंद्र ऐनापुरे काम करीत आहे. यानिमित्ताने वृक्षारोपण व संवर्धन, पाणपोई, कर्णबधिर मुलांना खाऊ वाटप, विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, बालसाहित्य पुस्तके वाटप असे विविध उपक्रम राबवले आहेत. राबवले जात आहेत. याशिवाय मराठी साहित्य सेवा मंच या माध्यमातून जत तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जात आहेत. आतापर्यंत 20 साहित्य संमेलन आणि काव्य संमेलने  भरवण्यात आली असून संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध लेखक आंनद यादव, फ. मुं.शिंदे, प्रसिद्ध सिनेकवी बाबासाहेब सौदागर, विठ्ठल वाघ, वैजनाथ महाजन, डॉ.श्रीपाद जोशी,राजन खान, आप्पासाहेब खोत आदींना आमंत्रित करण्यात आले आहे.
ग्रंथसंपदा आणि ब्लॉग
गेली वीस-पंचवीस वर्षे महाराष्ट्रातल्या आघाडीच्या वृत्तपत्रांबरोबरच स्थानिक वृत्तपत्रांमध्ये श्री. मच्छिंद्र ऐनापुरे सर  विविधांगी,विविध विषयांवर लेखन करीत आहेत. लोकसत्ता,पुढारी, सकाळ,गावकरी, सामना, तरुण भारत,संचार,केसरी,पुण्य नगरी, महासत्ता, लोकमत या दैनिकांबरोबरच माणदेश नगरी,संकेत टाइम्स, नवा महाराष्ट्र आदी स्थानिक दैनिकांमध्ये  सातत्याने लेखन प्रसिद्ध होत आहे. किशोर, मुलांचे मासिक, केसरीचा छावा,छोट्यांचा छोटू या मुलांच्या मासिकांमध्येही ते आवर्जून लिहित आहेत.  ‘जंगल एक्सप्रेस’ (बालकथासंग्रह), हसत जगावे (विनोदी कथासंग्रह), सामान्यातील असामान्य (व्यक्तिचित्रे), गोष्टी स्मार्ट बालचमूच्या, माकडाचा पराक्रम (बालकथासंग्रह),रहस्यमय अंगठी, असेही एक रहस्य (रहस्यकथा संग्रह) अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. याशिवाय ‘विचारांच्या प्रदेशात’ (लेखसंग्रह), यशाचा मूलमंत्र (प्रेरणादायी लेखसंग्रह) आणि ‘देव आले दारी’ (बालकथा संग्रह ) प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या मच्छिंद्र ऐनापुरे या नावाने असलेल्या ब्लॉगवर सुमारे दोन हजारांहून लेख प्रसिध्द आहेत.  आजच्या विद्यार्थ्यांना आणि  युवकांना डोळ्यांसमोर ठेवून, त्यांना प्रेरणा मिळावी,यासाठी खास करून लेखन केलं आहे. आज तरुण पिढी बहकत चालली आहे, याची खरे तर चिंता सतावत आहे. या युवकांना, किशोरवयीन मुलांना योग्य मार्गदर्शन होण्याची गरज आहे. आज नोकर्‍या नाहीत, उद्योगधंदे-व्यवसाय करण्याचे मार्गदर्शन नाही. त्यातच आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांना उद्योग,व्यवसायाचे वावडे आहे. त्यामुळे आजची शिक्षित पिढीदेखील काळजीत आहे. या युवकांमध्ये काही तरी करण्याची धमक निर्माण होण्याची आवश्यकता आहे.त्यांच्यात एकाग्रता, जिद्द,मेहनत,चिकाटी,सातत्य, झपाटलेपणा ही गुणवैशिष्ट्ये उतरल्याशिवाय त्यांना यश मिळणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडायला हवे. तरच त्यांचा विकास शक्य आहे. आवडीच्या क्षेत्रात ते मोठी भरारी घेऊ शकतात. मग तो व्यवसाय,उद्योग असेल अथवा नोकरी, समाजकार्य असेल.ज्यात जीव रमतो,त्याला प्राधान्य दिल्यास यश तर मिळेलच पण त्याचा जीवही त्यात चांगला रमेल. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे एक चांगला,भला माणूस म्हणून आपली ओळख निर्माण व्हावी, असा विचार युवकांनी करायला हवा. या जगात, देशात, महाराष्ट्रात नव्हे आपल्या आजूबाजूला अशी माणसे आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि आपले आयुष्य युवकांनी घडवावे, असे वाटल्याने श्री. ऐनापुरे यांनी अशा आपल्या स्वकर्तृत्वातून यशस्वी झालेल्या लोकांविषयी लिहिण्याचे काम हाती घेतले. यातली व्यक्तीेचित्रे स्थानिक वृत्तपत्रांबरोबरच मार्मिक (साप्ताहिक), किशोर (मासिक) मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. किशोरमध्ये प्रसिद्ध झालेले धाडसी कॅप्टन: राधिका मेनन हे व्यक्तिचित्र 2018 च्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व संशोधन मंडळाने आठवीच्या बालभारतीच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. ही चरित्रे प्रेरणादायी आहेत. मुलांना, युवकांना विचार करायला लावणारी आहेत. त्यामुळे ही व्यक्तिचित्रे पुस्तक स्वरुपात आणली आहेत.

 

 

शंब्दाकन :

– मोहन मानेपाटील,जत

Rate Card

– लवकुमार मुळे,शेगाव

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.