जत,संकेत टाइम्स : पोलीस असल्याचे सांगून जत शहरातील मंगळवार पेठ येथील ८५ वर्षीय महिलेला लुटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शहरातील मंगळवार पेठ येथील ८५ वर्षीय सुरजदेवी मिसरीमय ओसवाल या दररोज उमराणी रोडवरील शिवानुभव मंडपाजवळ असलेल्या जैन मंदिरात दर्शन व पूजेसाठी जातात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता त्या मंदिराकडे निघाले असता एक अज्ञात तरुण मोटारसायकलवर आला. त्याने आपण साध्या वेशातील पोलीस असल्याचे सूरजदेवी यांना सांगितले. काल शहरातील सरिता नावाच्या महिलेच्या घरात घुसून चोरटयांनी सोने नेले आहे तेव्हा तुम्ही तुमच्या हातातील बांगड्या काढून द्या, पुडीत बांधून ठेवतो व पुन्हा आल्यावर देतो असे सांगितले.
सुरजदेवी यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून हातातील बांगड्या काढून त्या व्यक्तीकडे दिल्या. त्याने पुडी बांधून बरोबर हातचलाखी करत आपल्या जवळ असलेल्या पिशवीतून दुसरी पुडी काढून देत तेथून निघून गेला.
थोडया वेळाने सुरजदेवी यांनी पुडी उघडून पाहिले असता त्यात बनावट बांगड्या मिळून आल्या. सुरजदेवी ओसवाल यांनी याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत एक लाख ६५ हजार किमतीचे सोने लंपास झाले आहे तपास सपोनि विनोद कांबळे करत आहेत.दरम्यान आठवडयातील दुसरी घटना आहे.महिलांच्या अंगावरील सोने लुटल्याची आठवडातील ही दुसरी घटना आहे. मागील आठवड्यात अशाच पद्धतीने महिलेला लुटले आहे.