सांगली : जागतिक आरोग्य दिनानिमित्त सांगली जिल्हा न्यायालयाच्या आवारात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिरामध्ये ईसीजी तपासणी 98. नेत्र तपासणी 62, रक्ततपासणी 166 व उर्वरित प्राथमिक आरोग्य तपासणी 162 अशी एकूण 328 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सुमारे 25 ते 30 जणांनी रक्तदान केले.
सांगली जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली दि वकील बार असोसिएशन, न्यायालयीन कर्मचारी संघटना, सांगली व पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अजेय राजंदेकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश क्र. १. आर. के. मलाबादे, जिल्हा न्यायाधीश क्र. २ डी. पी. सातावळेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. नरडेले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, वकील बार संघटनेचे उपाध्यक्ष श्री. लांडे, सांगली न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मोफत आरोग्य तपासणीमध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, डोळ्याची तपासणी, रक्ताची चाचणी, ईसीजी तपासणी या करीता व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. प्रमोद चौधरी, केदार पाटील, लक्ष्मीकांत मगदूम, अनिता हसबनीस, रतिनंद कांबळे, जगन्नाथ बाबर, रमेश कोथळे, विकास सातपुते उपस्थित होते. यावेळी सांगली न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी, सांगली बारचे वकील तसेच कर्मचारी वर्गांनी तपासणीचा लाभ घेतला.
या मोफत आरोग्य तपासणी करीता जिल्हा शल्य चिकित्कस डॉ. संजय साळुंखे यांचे विशेष आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. नरडेले यांनी मानले. शिबिराचे नियोजन जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक महेश कुलकर्णी, सहा अधिक्षक श्री. सन्मुख, जिल्हा विधी सेवेचे कर्मचारी सचिन नागणे, नितीन आंबेकर यांनी केले.