जत, संकेत टाइम्स : कुंभारी-जत या राज्य महामार्गावर मोटारसायकल अपघातात कोसारी येथील तीन युवक ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. कोसारी ता. जत येथील चार मित्र एकाच मोटरसायकलवरून कोसारीकडे जात असताना बिरनाळ नजीकच्या ओढापात्रात रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या घटनेत अजित नेताजी भोसले (वय २२), मोहित शिवाजी तोरवे (वय २१), राजेंद्र संजय भाले (वय २२) अशी मृत तिघांची नावे आहेत. संग्राम विक्रम तोरवे (वय १६) हा गंभीर जखमी झाला असून ग्रामीण रुग्णालय जत येथे उपचार सुरू आहेत.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हे चौघेजण मित्र शनिवारी जतला गेले होते, रात्री उशिरा गावाकडे परतत असताना बिरनाळ जवळच्या ओढा पात्राजवळ गाडीचा ताबा सुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
या घटनेत अजित भोसले हा जागीच ठार झाला, तर जखमी मोहित तोरवे, राजेंद्र भाले आणि संग्राम तोरवे यांना बिरनाळ येथील लोकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यातील गंभीर जखमी मोहित तोरवे आणि राजेंद्र भाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.