पुणे : आषाढीवारी पालखी सोहळा दरम्यान पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध केली असून आरोग्य पथकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रुग्णांना आरोग्य सेवा पुरवण्यासह कोविड तपासण्या तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत १७३ बाह्यरुग्ण पथकांच्या माध्यमातून ७९ हजार ३६९ रुग्णांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत.
पुणे ग्रामीण हद्दीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीची आळंदी, सासवड, जेजूरी, वाल्हे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीची देहू, लोणीकाळभोर, यवत, वरवंड, उंडवडी गवळ्याची, बारामती, सणसर, अथूर्णे, निमगांव केतकी, इंदापूर व सराटी ही मुक्कामाची ठिकाणे असून पालख्यांचे मार्गक्रमण सुरू आहे. आज (२८ जून रात्री) ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मुक्काम फलटण तालुक्यातील लोणंद येथे असून संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम बारामती येथे असणार आहे.
पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभागाने चोख व्यवस्था केली आहे. दोन्ही पालख्यांसाठी रुग्णवाहिका ओपीडी पथके, प्राथमिक आरोग्य केंद्र/ग्रामीण रुग्णालयांची रुग्णालय पथके, पालखीतळ आरोग्य पथके, आरोग्यदूत पथक, फिरती रुग्णवाहिका ओपीडी पथके अशी बाह्यरुग्ण उपचार पथके नेमण्यात आली आहेत. पालखी मार्गावर ११० वैद्यकिय अधिकारी, १०४ समुदाय आरोग्य अधिकारी तसेच ३३६ आरोग्य कर्मचारी असे ५५० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रुग्णांना संदर्भसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी दोन्ही पालखी मार्गावर चित्ररथ देण्यात आलेला आहे. सर्व सेवांचे संनियंत्रण करण्यासाठी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
*वारकऱ्यांसाठी आरोग्यदूत*
यंदाच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये आरोग्य दूत पथके नेमण्यात आली असून ते दूचाकी वाहनावरुन अडचणीच्या ठिकाणी, गर्दीमध्ये, वाहतूक कोंडीमध्ये सहजपणे पोहोचून पालखी दरम्यान आरोग्य सेवा उपलब्ध करुन देत आहेत. त्यांच्या दुचाकीवर औषधांच्या किटच्या बॉक्समध्ये आवश्यक ती औषधे व ड्रेसिंग मटेरियल देण्यात आलेले आहे. मार्गावरील टँकर, पाणी भरण्याची ठिकाणे, हॉटेल आदी ठिकाणच्या पाण्याची ओटी टेस्ट घेऊन तपासणी करण्याचे काम आणि पाणी पुन:शुद्धीकरणाचे कामदेखील आरोग्य दूतामार्फत करण्यात येत आहे.
किटकजन्य व जलजन्य आजाराचा प्रसार होऊ नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजनादेखील करण्यात आल्या आहेत. दोन्ही मार्गावरील २१ मुक्कामाच्या ठिकाणांसह ८० गावांमध्ये आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचेमार्फत घरोघरी जाऊन किटकशास्त्रीय सर्वेक्षण, ताप रुग्ण सर्वेक्षण, डास अळी दूषित पाणी आहे का हे पाहण्यासाठी कंटेनर सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार उपाययोजना तसेच पालखी मुक्काच्या ठिकाणी पालखी आगमनापूर्वी धूरफवारणी करण्याची कार्यवाही सुरु आहे.
पालखी बरोबर जाणाऱ्या दिंड्यामधील वारकऱ्यांना किरकोळ आजाराकरिता ऐनवेळी औषधांची उपलब्धतता व्हावी यासाठी दिंडी प्रमुखांकडे औषध किट उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
राज्यातील कोविड-१९ रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पालख्यांमध्ये मिळून फ्लूसदृश्य व इतर लक्षणे असलेल्या ७८२ वारकऱ्यांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये २ कोविड बाधित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
भाविकांच्या कोविड लसीकरणावरही विशेष भर देण्यात येत असून आतापर्यंत ९१६ भाविकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ११९ पहिली मात्रा, ४२६ दुसरी मात्रा तर ३७१ भाविकांना वर्धक मात्रा देण्यात आली आहे.
*”सर्व अधिकारी आणि कर्मचारी सेवाभावनेने वारीसोबत आहेत. भाविकांना वारीचा आनंद घेता यावा यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.” – डॉ.भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी*