जगद्गुरूश्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत प्रशासनाच्यावतीने स्वागत

0

 

बारामती : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती शहरामध्ये ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले.पाटस रोडवरील देशमुख चौकात प्रशासनाच्यावतीने ‍ प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले.

 

यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, एन्व्हायरमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बारामती शहरात चौकाचौकात विविध संस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारले गेले आहेत. काही सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणी पुरवठा व इतर सेवा पुरवण्यात येत आहेत. सर्व वातावरण हरी भक्तांनी गजबजून गेले आहे.

 

Rate Card

नगरपरिषेदेकडून वारकऱ्यांसाठी सुविधा

आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बारामती नगरपरिषदेने पूर्वतयारी केली आहे. शारदा प्रांगण व नगरपरिषद परिसरात वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. निर्मल वारी अंतर्गत शहरात विविध ठिकाणी ८०० सीट फिरते शौचालयाची सोय करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून संपूर्ण शहरात धूर फवारणी करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा ३.० अंतर्गत पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्लास्टिक मुक्त बारामती, प्रदूषण मुक्त वारी व पर्यावरण हरित संतुलनासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे.

या पालखी सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान, सांस्कृतिक कार्य संचालनालय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण, बारामती नगर परिषद इत्यादी विभागांच्या चित्र रथातून शासनाच्या योजनांची जनजागृती करण्यात येत असून या चित्ररथास वारकऱ्यांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.