लोकांचा नाथ एकनाथ मुख्यमंत्र्यांचे कौतुक’ | स्वखर्चातून विशेष विमानाने रुग्णांना बिहारमधून पुण्यात आणलं

0
4

मुंबई : राज्याच्या राजकारणात वादळ उठवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्टिव्ह मोडमध्ये आले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ‘लोकांचा नाथ एकनाथ’ अशा आशयाचे बॅनर शिंदे समर्थकांनी झळकवले होते. आता खरंच एकनाथ शिंदे सामान्यांसाठी लोकनाथ झाले आहेत का ? असा प्रश्नही राजकीय पटलावर उपस्थित केला जात आहे. पण, बिहारमध्ये झालेल्या एका घटनेत शिंदे यांनी केलेल्या समाजकार्याचे कौतुक केले जात आहे. बिहार येथे एका दुर्घटनेत जखमी झालेल्या मराठी कुटुंबाला तातडीनं उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले. या कुटुंबाला पुण्यात दाखल करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चाने विशेष विमानाची सुविधा दिली. त्यानंतर बिहारच्या स्थानिक मराठी नागरिकांनी ‘शिंदे साहेबांना मानलं’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील खटाव तालुक्यातील गुरसाळे येथे राहणारे अमोल जाधव यांचे कुटुंब बिहारमधील पाटणा येथे उदरनिर्वाह करत होते. शनिवारी मध्यरात्री २ वाजता जाधव यांच्या राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट झाला. या स्फोटात कुटुंबातील चार जण मोठ्या प्रमाणात भाजले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी पाटणाच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, पुढील उपचारासाठी रुग्णांना पुणे किंवा मुंबईच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल, असं तेथील डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी पुण्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि एअर अॅम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

 

 

परंतु, एअर अॅम्ब्युलन्स कंपनीने एका वेळी एकच रुग्ण नेण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर नातेवाईक हतबल झाले. हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा रुपयांचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांना मोठी चिंता वाटू लागली.त्यानंतर त्यांनी नातेवाईकांकडे मदतीसाठी विनंती केली. पण त्यांच्या मदतीसाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. त्यानंतर प्रचंड मानसिक तणावात असलेल्या जाधव कुटुंबीयांनी आमदार अनिल बाबर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. सदर कुटुंबीयांनी घडलेल्या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.

 

त्यानंतर या घटनेची तातडीनं दखल घेत खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया संपर्क केला. तात्काळ शासकीय एअर अॅम्ब्युलन्स मिळण्यासाठी सिंधियांकडे विनंती केली. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. वेळ अतिशय कमी असल्याने शिंदे यांनी स्वखर्चातून दोन एअर अॅम्ब्युलन्स बुक केल्या. त्यानंतर त्या कुटुंहबाला तातडीनं पुण्यात दाखल करण्याचे आदेश शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना दिले.

जखमी झालेल्या ११ वर्षांच्या मुलाला घेवून आज सकाळी सहा वाजता विशेष विमान पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्या १२ वर्षांच्या रुग्णाला दुसऱ्या विमानाने सकाळी ११ वाजता पुण्यात दाखल करण्यात आले. शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे यांच्या सहाय्याने पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात रुग्णांना दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here