पनवेल : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. सध्या दोन मंत्र्याचेच मंत्रिमंडळ आहे.भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धक्कादायक विधान करत मोठी खंत व्यक्त केली आहे. आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत वक्तव्य केले आहे.
पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत.ओबीसी राजकीय आरक्षण लागू झाल्यामुळे आगामी मनपा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यांची रणनीती या बैठकीत ठरणार आहे. प्रदेश कार्यकारिणीला प्रदेश प्रभारी, राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी आणि राष्ट्रीय संघटनमंत्री शिवप्रकाश उपस्थित आहेत.
प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. शिंदेंना मुख्यमंत्री करण्याच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाचे आपल्याला दुःख झाले. पण ते दुःख पचवून आपण सर्व पुढे गेलो, असे पाटील म्हणाले. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर येणार याकडे लक्ष लागले आहे.