सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून खुनातील एका आरोपीने पलायन केले आहे.रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वैरण अड्डा येथील भिंतीवरून आरोपी उडी मारून पसार झाला.सुनील राठोड असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.यामुळे कारागृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सुनील राठोड आणि त्यांच्या पत्नीला तासगाव मधील एका खून प्रकरणी अटक करण्यात आली होती.
याबाबतची अधिक माहिती अशी की,सुनील हा जेसीबी मालक हरी पाटील राहणार- मंगसुळी यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता.मालक हरी पाटील यांनी सुनील याची पत्नी पार्वती हिच्या अंगावर हात टाकला होता.त्यामुळे चिडून जावून सुनील आणि त्याच्या पत्नीने ८ जुन २०२१ रोजी जेसीबी मालक हरी पाटील याचा निर्घृण खून करून मृतदेह विहिरीत टाकला होता.या प्रकरणाचा तपास तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने करून सुनील आणि तिची पत्नी पार्वती हिला अटक केली होती.सुनील हा सांगली कारागृहात जेरबंद आहे.रविवारी सकाळी त्याने कारागृहातून पलायन केले आहे.
याबाबतची तक्रार कारागृह प्रशासनाने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. सुनील राठोड याला पकडण्यासाठी पोलिसांच्याकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.तसेच या आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक कर्नाटकाकडे रवाना झाले आहे.