महिला बचत गट : नवसंजीवनी

0

राज्य सरकारने 1994 मध्ये महिला सबलीकरण व सक्षमीकरण धोरण जाहीर केले. त्यामुळे स्वयंसहायता बचत गटातून महिलांना स्वावलंबी होण्याचा मार्ग निर्माण झाला. महिला स्वयंसहाय्यता बचत गट म्हणजे आर्थिक पारतंत्र्यातून आर्थिक स्वातंत्र्याकडे, परावलंबनाकडून स्वावलंबनाकडे व स्वावलंबनाकडून प्रगतीकडे जाण्याकरता स्वयंस्फूर्तीने, सहमतीने व एक विचाराने एकत्र येऊन स्थापन केलेला गरजू महिलांचा गट. महिला गटांची चळवळ महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे. गावोगावी बचत गटाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. महिला बचत गटा मध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना पैसा बचत करण्याची सवय लागते. सर्व सदस्यांनी एकत्र येऊन बचत गटाला नाव देण्यासाठी एकमताने ठराव पास करावा. नंतर बचत गटाचे खाते राष्ट्रीयीकृत बँकेत काढावे. बचत गटाचे लेटर पॅड व स्टॅम्प तयार करून घ्यावा. प्रत्येक महिन्याला बचत गटातील सर्व सदस्यांनी समप्रमाणात बचत करावी व ते पैसे बचत गटांच्या खात्यात टाकावे. नंतर बचत गटासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांची निवड करण्यासाठी सर्व महिलांनी एकत्र येऊन ठराव पास करावा. नंतर बचत गटाच्या पैशांचे व इतर व्यवहार अध्यक्ष व सचिव हे पाहतील. दरवर्षी अध्यक्ष व सचिव यांची नवीन निवड करावी म्हणजे सर्वांना काम करण्याची संधी मिळते.

 

बचत गटाच्या नोंदी ठेवण्यासाठी रजिस्टर खरेदी करून सर्व नोंदी ठेवाव्यात. बचत गटाच्या कामासाठी स्वतंत्र रूम असावी. त्यामध्ये कपाट, टेबल-खुर्ची, कॅलेंडर रजिस्टर, प्रक्रिया उद्योग संबंधित पुस्तके, मासिके, दैनिके असावीत. प्रत्येक महिन्यात सर्वांनी मिळून कोणते काम करावयाचे आहे ते ठरवून काम पूर्ण करणे गरजेचे आहे. कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केल्यानंतर बचत गटातील महिलांनी त्याची परतफेड कशी करावी, व्याजदर किती राहील याविषयी संबंधित बँकेचे व्यवस्थापक सर्व माहिती देतील. जो व्यवसाय सुरू केला आहे त्या व्यवसायाच्या सर्व नोंदी व्यवस्थित असाव्यात. व्यवसायातून जो नफा होईल त्याचे वाटप सर्व गटातील महिलांनी करून घ्यावे. बचत गटाचे सर्व व्यवहार चांगले ठेवल्यास बँक आपणाला जास्त कर्ज देऊ शकते. परंतु त्यासाठी चिकाटी व जिद्द अत्यंत महत्त्वाचे आहे. बचत गटांचे उद्योग चांगले फायदेशीर झाल्यानंतर महिला स्वतःच्या कुटुंबासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करू शकतात. जोपर्यंत महिला आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होणार नाहीत. तोपर्यंत ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व महिलांनी बचत गटामध्ये सहभागी होऊन आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होणे गरजेचे आहे.

 

बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री:

बचत गटातील महिलांनी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यानंतर त्यांची नोंदणी अन्न व औषध प्रशासन या ठिकाणी करावी. जे बचत गट शहरात आहेत त्यांनी नगरपालिकेत नोंदणी करावी. आपल्या प्रक्रियायुक्त वस्तूसाठीची पॅकिंग तयार कराव. पॅकिंग चांगले असेल तर आपल्या पदार्थाची विक्री जास्त प्रमाणात होते. साध्या पॅकिंग मध्ये पदार्थांची विक्री जास्त प्रमाणात होत नाही. बचत गटातील पदार्थांची किंवा वस्तूंची विक्री करण्यासाठी आपल्या गटातील महिलांना जिम्मेदारी देणे गरजेचे आहे. कारण मार्केटिंग हे आपण कसे बोलतोय यावर ते अवलंबून असते. बचत गटामार्फत प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले व त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली तर महिलांना चांगल्या फायदा होऊ शकतो. त्यासाठी महिलांनी आपले पदार्थ गावातील दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवावे. तसेच आठवडी बाजारात देखील आपला स्टॉल लावणे गरजेचे आहे. शहरातील होलसेल दुकानदारांना देखील महिला आपल्या वस्तूंची विक्री करू शकतात. या व्यतिरिक्त शहरांमध्ये मॉलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्या ठिकाणी देखील महिलां आपल्या वस्तूंची विक्री करू शकतात.

Rate Card

 

महिलांनी विक्री व्यवस्थेला घाबरून न जाता आपल्यावस्तू विक्री करण्यासाठी जाहिरात करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ लोकलचा टीव्ही चॅनेल, रेडिओ, पोम्प्लेट तयार करून पब्लिक प्लेस ला चिटकवणे, पोम्प्लेटचे वाटप करणे इत्यादी. तसेच ग्रामसभेत ठराव पास करून ग्रामपंचायत मधील गाळा भाड्याने घेणे. तसेच आपल्या गावातील लोकांचे आवश्‍यकतेप्रमाणे उद्योग चालू केला म्हणजे आपल्या वस्तूंची विक्री सहजासहजी होईल. मोबाईलच्या व्हाट्सएपच्या ग्रुप वरती तुम्ही तुमच्या वस्तूंची किंवा पदार्थांची माहिती पाठवू शकतात. तसेच दरवर्षी शहरांमध्ये प्रदर्शन असतात त्यावेळी आपला स्टॉल प्रदर्शनात ठेवला तर आपल्या वस्तूंची विक्री होईल. ग्राहकांना एकदा वस्तू किंवा पदार्थ आवडले म्हणजे नंतर ते स्वतः येऊन वस्तू घेऊन जातील. आपण निर्माण केलेल्या पदार्थांच मार्केटिंग आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो हा विश्वास आपण सर्वांनी मनात ठेवणे गरजेचे आहे. तसेच बचत गटातील महिला शेळी पालन, कुकुटपालन, गांडुळ खत, रोपवाटिका संगोपन असे शेतीपूरक व्यवसाय देखील करू शकतात.

 

 

डॉ. दादासाहेब खोगरे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तडसर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, मोबाईल नंबर- 9370006598

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.