अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाची संस्मरणीय भेट!                     

0
3

 

सोमवारी ८ ऑगस्टला राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता झाली. २८ जुलैला सुरू झालेली ही क्रीडा स्पर्धा इंग्लंडमधील बर्मिंगहम येथे पार पडली. ऑलिम्पिक नंतरची मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते कारण जगातील  विविध देशातील ७२ संघ या स्पर्धेत भाग घेतात. या स्पर्धेचा विचार करता ही स्पर्धा २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकनंतरची सर्वाधिक महागडी स्पर्धा ठरली. या स्पर्धेला ७४ अब्ज डॉलर इतका खर्च आला. ही स्पर्धा ऑलिम्पिक नंतरची सर्वाधिक मोठी स्पर्धा ठरली कारण या स्पर्धेत जगातील सहा हजारांहून अधिक खेळाडू आपल्या देशाचा  नावलौकिक उंचावण्यासाठी मैदानात उतरले. या सर्व खेळाडूंची एकच स्वप्न असते ती म्हणजे देशासाठी पदक जिंकणे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे खेळाडू जीवाचे रान करतात.

 

भारताच्या दृष्टीने विचार करता भारतासाठी ही स्पर्धा संस्मरणीय ठरली. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत चकमदार कामगीरी करून भारताचा तिरंगा क्रीडा नगरीत डौलाने फडकविला.  भारताने या राष्ट्रकुल क्रीडा  स्पर्धेत तब्बल ६१ पदकांची कमाई केली. यात २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि  २३ कांस्यपदके होती.  विशेष म्हणजे भारताने वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारात चमकदार कामगिरी करत पदके मिळवली. भारताला सर्वाधिक सुवर्णपदकं कुस्तीपटूनी मिळवून दिली. भारताच्या कुस्तीपटूनी या स्पर्धेत ६ सुवर्ण, १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई केली. कुस्तीनंतर सर्वाधिक पदके जिंकून दिली ती वेट लिफ्टिंगने. भारताच्या वेट लिफ्टर्सने यावेळी चमकदार कामगिरी करत ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्यपदकांची कमाई केली. विशेष म्हणजे भारताला  पहिले सुवर्णपदक हे वेट लिफ्टिंगमध्येच मिळाले.  मीराबाई चानू हिने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले होते.

 

यावेळी सर्वाधिक आश्चर्याचा धक्का दिला तो टेबल टेनिस खेळाडूंनी कोणतीही अपेक्षा नसताना यावेळी टेबल टेनिस मध्ये भारताने  ४ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्यपदक अशी ७ पदकांची कमाई केली. भारतीय टेबल टेनिससाठी हे शुभ चिन्ह आहे. मुष्टियुद्ध आणि बॅडमिंटन खेळाडूंकडून देशवासियांची जी अपेक्षा होती ती या खेळाडूंनी  पूर्ण केली. भारताने मुष्टियुद्धात ३ सुवर्ण,  ३ रौप्य आणि १ कांस्य असे ७ पदके मिळवली तर बॅडमिंटनमध्येही ४ सुवर्ण पदकांची कमाई केली. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने सुवर्ण मिळवण्याचे ऑलिम्पिकमध्ये अपूर्ण राहिलेले  स्वप्न येथे पूर्ण केले.

 

एथलॅटिक्स मध्येही भारतीय खेळाडूंनी कमाल केली. भारतीय एथलॅटिक्सने १ सुवर्ण ४ रौप्य आणि आणि ३ कांस्य पदकांची कमाई केली. स्क्वाश,ज्यूडो आणि लॉन बॉल या खेळातही भारतीय संघाने अप्रतिम  कामगीरी करत पदके मिळवली. भारताच्या हॉकी संघाला सुवर्ण जिंकता आले नाही मात्र पुरुषांनी रौप्य तर महिलांनी कांस्यपदक जिंकून पदकांची पाटी कोरी राहणार नाही याची काळजी घेतली. महिला क्रिकेट संघाणेही रौप्यपदकाला गवसणी घातली. एकूणच भारताने या स्पर्धेत समाधानकारक कामगीरी केली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील खेळाडूंनीही देशासाठी पदके जिंकली. भारताने या स्पर्धेत चमकदार कामगीरी करून चौथा क्रमांक मिळवला. भारतीय खेळाडूंची ही कामगिरी अभिमानास्पद आहे. त्यांच्या कामागरीचा देशातील १४० कोटी जनतेला सार्थ अभिमान आहे.  या खेळाडूंनी देशासाठी पदके जिंकून भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आहे.

 

६१ पदके जिंकून या खेळाडूंनी देशवासियांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाची भेटच दिली आहे. ही भेट संस्मरणीय अशीच आहे. हेच खेळाडू आगामी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील त्यामुळे तिथेही ते अशीच चमकदार कामगिरी करून देशाचा तिरंगा डौलाने फडकवतील अशी आशा करूया. राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी आणि सहभागी खेळाडूंचे मनापासून अभिनंदन! जय हिंद!!

 

श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here