जत : सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेले चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती , श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा यांनी गणेशोत्सव काळात जत व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावातील गणेश मंडळांना भेटी दिल्या. जत तालुक्यातील ६० हून अधिक गावातील गणेश मंडळाना तुकाराम बाबा महाराज यांनी भेटी देत विविध सामाजिक विषयावर जनजागृती केली.
तुकाराम बाबा यांनी कोरोना, महापूर, दुष्काळ, अतिवृष्टी, अपघात, नैसर्गिक आपत्तीवेळी मदत नव्हे कर्तव्य म्हणून काम केले आहे. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. सामाजिक क्षेत्राबरोबरच अध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. २०१० पासून एक गाव एक गणपती मोहीम राबविणाऱ्या गावाला तुकाराम बाबा यांनी श्री च्या मुर्त्या भेट दिल्या आहेत. यंदाही ४० हुन अधिक गावात एक गाव एक गणपती मोहीम राबविणाऱ्या गावांना श्री च्या मुर्त्या भेट दिल्या आहेत.
कोरोनाच्या महामारीनंतर प्रथमच गणेश भक्तांनी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला. तुकाराम बाबा यांनी गणेशोत्सव काळात जत तालुक्यातील ६० हुन अधिक गावातील गणेश मंडळाना भेटी देत सामाजिक जनजागृती मोहीम राबवली. भेटी दरम्यान तुकाराम बाबा यांनी गणेश मंडळांना प्रत्येक गावात एक गाव, एक गणपती मोहीम का आवश्यक आहे हे सांगण्याबरोबरच गणेश मंडळांनी विधायक कार्य हाती घ्यावे असे आवाहन केले. जत तालुक्यातील वाढत्या अपघाताबद्दल तुकाराम बाबा यांनी चिंता व्यक्त करत अपघात घडल्यास ज्या पद्धतीने श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना मदतीसाठी धावते त्याच पद्धतीने वर्षभर मंडळानी सक्रिय राहून अपघातग्रस्तांना मदत करावी असे आवाहन केले. अध्यात्म व सामाजिक कार्यात युवकांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन तुकाराम बाबा यांनी केले.
■ १२ वर्षात हजाराहून अधिक श्री च्या मूर्तीचे वाटपराष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य २०१० पासून मंगळवेढा तालुक्यात तर २०१९ पासून जत तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ राबविणाऱ्या गावांना श्री ची मोफत मूर्ती भेट देण्याचा अभिनव उपक्रम तुकाराम बाबांनी सुरू केला. गावात एकोपा, सलोखा वाढावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाबांनी एक गाव एक गणपती राबविण्याचे आवाहन गावकऱ्यांना प्रत्येक वेळी केले. ज्या गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला त्या गावाला बाबांनी श्री ची मूर्ती भेट देत त्यांना प्रोत्साहन दिले. मागील १२ वर्षात हजाराहून अधिक गावांना तुकाराम बाबांनी श्री च्या मुर्त्या भेट दिल्या आहेत.■ तुकाराम बाबांचे कार्य कौतुकास्पद- – पंकज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उमदी.तुकाराम बाबा महाराज यांनी प्रत्येक गावांनी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवावा यासाठी प्रशासनासोबत कार्य केले आहे. गणेशोत्सव काळात तुकाराम बाबांनी गणेश मंडळांना भेटी देत विविध विषयांवर समाजजागृती करण्याबरोबरच पुढील वर्षी तरी गावात एकच गणपती बसवा असे आवाहन केले आहे. तुकाराम बाबांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पत्रकारांशी बोलताना आवर्जून सांगितले.