पुणे : महावितरण पुणे प्रादेशिक विभागातील 12 लाख 54 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 7902 कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी व चालू बिलाची 4 हजार 137 कोटी, अशी एकूण 12039 कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांनी कृषिपंप धोरण-2020 मध्ये दिलेल्या भरघोष सवलतीचा फायदा घेऊन आपले वीजबिल कोरे करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्री अंकुश नाळे यांनी केले आहे.
राज्यात कृषिपंपासाठी सगळ्यात जास्त वीजेचा वापर पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात होत असून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविणारे श्रीमंत शेतकरी या भागात आहेत. महागडी चारचाकी वाहन वापरणारे, बंगल्यात राहणारे व नियमित आयकर भरणारे शेतकरी मात्र वीजबिल भरण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे आढळून आले आहे.
या पाचही जिल्ह्यात कृषिपंपासाठी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून ऊस, फळबागा, भाजीपाला व फुलशेती यासाठी वीजेचा बारोमास वापर करणाऱ्या सधन शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यांच्याकडूनही वीज बिल भरण्यास टाळाटाळ होत आहे.
मागील काही वर्षात थकबाकीत सातत्याने वाढ होत असल्याने आज महावितरणपुढे फार मोठे अर्थिक संकट निर्माण झाले आहे. महावितरणपुढे कर्जाचा डोंगर उभा झाल्याने संपूर्ण आर्थिक घडीच विस्कळीत झालेली आहे. ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी वीज उत्पादकांना रोजच पैसे द्यावे लागत असल्याने खर्चाचा ताळमेळ बसविणे अवघड होतं असल्याने शेतकरी बांधवांनी आपले वीजबिल भरणे आवश्यक झालेले आहे.
नविन कृषिपंप धोरण 2020 नुसार 31मार्च 2022 पर्यंत थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांना थकबाकीवर 50 टक्के सूट देण्यात आलेली आहे तर मार्च 2023 पर्यंतच्या थकबाकीवर 30 टक्के सूट देण्यात आलेली आहे. तसेच विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील 3 लाख 15 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 2 हजार 291 कोटी रुपयांची थकबाकी तर चालू बिलाची 1245 कोटी रुपयांची थकबाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 47 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 388 कोटी रुपयांची थकबाकी तर चालू बिलाची 219 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
सातारा जिल्ह्यातील 1 लाख 84 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 612 कोटी रुपयांची थकबाकी तर चालू बिलाची 388 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 3 लाख 69 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 3600 कोटी रुपयांची थकबाकी तर चालू बिलाची 1729 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
सांगली जिल्ह्यातील 2 लाख 40 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 1016 कोटी रुपयांची थकबाकी तर चालू बिलाची 555 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
या योजनेत एकदा सहभागी झालेला ग्राहक प्रत्येक चालू बिलासह त्याच्या सोयीनुसार थकबाकी भरू शकतो. या योजनेतून वसूल झालेल्या 66 टक्के रकमेचा वापर स्थानिक व जिल्हा पातळीवर महावितरणच्या विजेच्या पायाभूत सुविधा तसेच सेवा सुधारण्याकरिता खर्च करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुरळीत व योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळणार आहे. तेंव्हा थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.