सिद्धेवाडीत किडक्या रेशनचे वाटप | ग्राहकांमधून संताप : पुरवठा विभागाची गांधारीची भूमिका : रेशन चालकांकडून उडवाउडवीची उत्तरे

0
237

*

तासगाव : तालुक्यातील सिद्धेवाडी येथील स्वस्त धान्य दुकानातून किडक्या रेशनचे वाटप होत आहे. याबाबत ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. किडके धान्य वितरित करून सामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम सुरू आहे. पुरवठा विभागाने मात्र याबाबत गांधारीची भूमिका घेतली आहे. तर रेशन दुकानदार ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

       

शासनाकडून सामान्य नागरिकांना मोफत धान्याचा पुरवठा केला जातो. स्वस्त धान्य दुकानातून हे धान्य लोकांना पुरविले जाते. मात्र रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबाबत अनेकवेळा तक्रारी येत आहेत. या ठिकाणहून लोकांना अतिशय निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जाते. 

       

जे धान्य कोंबड्या व जनावरांनाही देण्याच्या लायक नाही, ते सामान्य लोकांच्या माथी मारले जात आहे. सामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा उद्योग पुरवठा विभागाकडून होत आहे. याबाबत गावागावातून अनेकवेळा तक्रारी होतात. मात्र महसूल प्रशासन सामान्य लोकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत आहे.

       

तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी येथील रेशन दुकानातूनही अतिशय निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वाटप सुरू आहे. या ठिकाणी देण्यात येणारा गहू अक्षरशः किडला आहे. गव्हाच्या पोत्यात बुरशी, मुंग्या, किडे दिसून येत आहेत. या पोत्यात गव्हाचे अक्षरशः किडून पीठ झाले आहे. 

       

याबाबत ग्राहकांनी रेशन धान्य दुकानदारास जाब विचारल्यानंतर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. सर्व तालुक्यातच अशा प्रकारचे धान्य आले आहे. आम्हास जे धान्य येते तेच आम्ही वितरित करीत आहोत. आम्ही काही करू शकत नाही, अशी उत्तरे देऊन ग्राहकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न होत आहे.

         

तासगाव तालुक्यातील अनेक गावात अशा प्रकारे रेशन दुकानातून निकृष्ट धान्याचे वाटप सुरू आहे. गोरगरीब, कष्टकरी, सामान्य लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. याबाबत गावागावातून तक्रारी आहेत. मात्र रेशन दुकानातील धान्याच्या गुणवत्तेबाबत कोणीही गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. कोंबड्या व जनावरे खाणार नाहीत इतके निकृष्ट धान्य सामान्य लोकांच्या गळ्यात घातले जात आहे.

         

तासगाव तहसील प्रशासन व पुरवठा विभागातील अधिकारी या धान्याबाबत अजिबात गंभीर नसल्याचे दिसत आहे. सामान्य लोकांना निकृष्ट धान्याचे वाटप होत असताना पुरवठा विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याबाबत तहसीलदार अतुल पाटोळे यांनी लक्ष देऊन तालुक्यात निकृष्ट धान्याचे होणारे वाटप थांबवावे. सामान्य लोकांना चांगले धान्य मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here