महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचे पडसाद जत नंतर सोलापूर जिल्ह्यातही उमटले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 28 गावे कर्नाटकात जाण्यास उत्सुक असल्याचे वृत्त समोर आल्याने खळबंळ उडाली आहे.अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर गावकऱ्यांनी बोम्मई सरकारचा विजय असो, कर्नाटकचा विजय असो, अशा घोषणा दिल्या आहेत. तडवळसह 28 गावातील ग्रामस्थ या मागणीसाठी एकवटले आहेत.
देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही रस्ते, पाणी, वीज, एसटी सेवा अशा प्राथमिक सेवाही मिळत नाहीत.अनेक वेळा मागण्यानंतर सरकारकडून आम्हची दखल घेतली जात नाही. म्हणूनच वैतागून आम्ही कर्नाटकात सामील होण्याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललोय, त्यांना फॅक्सही पाठवलाय.
कर्नाटकात सामील झाल्यावर सर्व सुविधा देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे, असं या ग्रामस्थांनी सांगितलं.
सन 2019 च्या लोकसभा निवडणूकीत आम्ही 28 ते 30 गावांनी मतदानावर बहिष्कार घातला. त्याचीही दखल राज्यकर्त्यांनी घेतली नाही.आमची दखलच घेणार नसतील तर आम्ही राज्यात राहू कशाला? असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.