जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात दुष्काळ परिस्थिती बदलण्यासाठी पावसाळ्यात म्हैसाळचे पाणी सोडा,यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पुर परिस्थिती रोकताही येईल व जतचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल,त्याचबरोबर तालुक्याच्या पुर्व भागातील गावासाठी महाराष्ट्राने कर्नाटकला दिलेले ६ टिएमसी पाणी कर्नाटकच्या योजनेतून सोडावे,अशी मागणी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी विधानसभेत घेतला.याबाबत शासन ठोस निर्णय घेणार का? असा सवालही उपस्थित केला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादा नंतर महाराष्ट्र शासनाने जतकडे विशेष लक्ष दिले आहे. विस्तारित योजनेला प्रशासकीय मंजूरी देत १९३२ कोटीचा निधीही जाहीर केला आहे. याबद्दल अधिवेशनात आ.सांवत यांनी शासनाचे आभार मानले.
अधिवेशनात बोलताना आ.सांवत म्हणाले,कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत तालुक्यातील सीमावर्ती ४२ गावावर दावा सांगितला.त्यानंतर राज्य शासनाने जतला निधी देत विस्तारित म्हैसाळ योजनेला प्रशासकीय मंजूरी देत या योजनेसाठी १९३२ कोटी रूपये मंजूर केले आहेत.यामुळे एक आशेनचा किरण निर्माण झाला आहे. शासनाने जतसाठी असाच भरीव निधी द्यावा.कर्नाटकचे पाणी घेऊन जतला द्या,जत तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.जतला दुष्काळ पडला की टंचाईतून
किमान पाच ते सात कोटी खर्च होतात. दुष्काळ पडल्यावर हे पैसे खर्च करण्यापेक्षा पावसाळ्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू करून जतचे तलाव भरून घ्यावेत. यासाठी जो विजेचा खर्च आहे तो
टंचाईमधून घ्यावा. याचा दुसरा फायदा पावसाळ्यात सांगली,कोल्हापूर भागात जी पूरपरिस्थिती निर्माण होते ती होणार नाही.
जत तालुक्यात पाणीसाठाही वाढेल. याबाबत शासन ठोस निर्णय घेणार का? असा सवाल आ. सावंत यांनी उपस्थित केला.राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी नुकताच जत दौरा केला.यावेळी जत पूर्व भागातील ग्रामस्थांनी कर्नाटकच्या सिमेवर दाखल झालेले तुबची बबलेश्वरचे पाणी जतला द्यावे, यासाठी करार करावा अशी मागणी केली होती.याकडे आ. सावंत यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेत माणुसकीच्या दृष्टीने महाराष्ट्राने कर्नाटकला सन २०१४-१५,२०१५-१६ व २०१७-२०१८ मध्ये प्रत्येक वर्षी दोन असे सहा टीएमसी पाणी दिले आहे. हेच पाणी विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण होईपर्यंत टप्याटप्याने जत पूर्व भागासाठी मागून घ्यावे व तेच पाणी जतला सोडावे, अशी मागणी केली.