जत : सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीस परवानगी दिल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात बैलगाडी शर्यतींना वेग आला आहे. शर्यतीसाठी पळणाऱ्या बैलांची किंमत व मागणी वाढू लागली आहे.त्यामुळे खिलार जनावराची संख्या वाढू लागली आहे.
बैलगाडी शर्यत हा ग्रामीण भागातील एक अत्यंत चुरशीची स्पर्धा मानली जाते. ग्रामीण भागात बैलगाडी शर्यती मोठ्या प्रमाणात होत आहेत.ग्रामीण भागात बैलांची संख्या जरी कमी असली तरी शर्यतीसाठीच्या बैलांची संख्या जास्त आहे.विना लाठी विना काठी या तत्त्वावर शर्यतींचे आयोजन करण्यात येते. बैलगाडी शर्यतीसाठी स्पर्धक वेगवेगळ्या भागातून सहभागी होतात. शर्यतीसाठीची बक्षीसे सुद्धा पाच ते दहा हजारापासून लाख रुपये पर्यंत असतात. शर्यतीसाठी प्रामुख्याने खिलारी बैलांचा वापर केला जातो.
शर्यतीसाठी पळणाऱ्या बैलांची किंमत ५० हजार पासून पंधरा लाख रुपये पर्यंत असल्याचे संयोजक सांगतात. साधारणपणे एक वर्षाच्या बैलापासून पळावू बैल शर्यतीसाठी तयार केले जातात. शर्यतीसाठी बैलांचा दररोज सराव घेतला जातो. शर्यतीच्या पळणाऱ्या बैलांसाठी मटकी, सातू, हरभरा, अंडी, उडीद, शेळीचे दूध असा आहार दिला जातो.
शर्यतीच्या बैलांची पशुपालक शेतकरी मुलाप्रमाणे काळजी घेतात.बैलांना जोपासण्यासाठी भरपूर खर्च केला जातो.लहान बैलासाठी दैनंदिन किमान पाचशे रुपये तर मोठ्या बैलासाठी किमान एक हजार रुपये दैनंदिन खर्च केला जातो. या पळणाऱ्या बैलांसाठी किमान सहा महिन्यातून एकदा लोणी, सोनकाव या पदार्थांनी शरीराची मसाज केली जाते.