‘ये फास्ट सर्विस बहुत अच्छा लगा’

0
5

ये फास्ट सर्विस बहुत अच्छा लगा

सांगली : उल्हासनगरच्या श्यामप्रसाद यांनी महावितरणकडे नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केला आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन अर्ज केल्या दिवशीच सायंकाळपर्यंत त्यांना कनेक्शन मिळाले. महावितरणच्या तत्पर सेवेमुळे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, ‘ये फास्ट सर्विस बहुत अच्छा लगा मेरे को’! श्यामप्रसाद यांच्यासह सहा वीज ग्राहकांना उल्हासनगरमध्ये गुरुवारी अर्ज केल्यानंतर एकाच दिवसात वीज कनेक्शन मिळाले. विशेष म्हणजे मुसळधार पाऊस आणि ठिकठिकाणी पाणी साचले असूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नवीन कनेक्शन झटपट दिली.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विविध पावले उचलली असून त्याचा एक भाग म्हणून ग्राहकांना वेगाने नवीन वीज कनेक्शन देण्याची सूचना केली आहे.

            कल्याण झोनचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी ग्राहकांना झटपट वीज कनेक्शन देण्यासाठी २४ – ४८ मोहीम सुरू करून श्यामप्रसाद यांच्यासारख्या ग्राहकांना तत्परतेने वीज कनेक्शन दिल्याबद्दल मा. लोकेश चंद्र यांनी श्री. औंढेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

            रिजन्सी लँडमार्कचे श्यामप्रसाद यांनी त्यांचा अनुभव सांगितला की, त्यांनी सकाळी मीटरसाठी अर्ज दिल्यानंतर महावितरणचा लाईनस्टाफ त्यांच्यासोबतच आला व त्याने पाहणी करून नव्या जोडणीसाठीचे शुल्क किती भरायचे ते दुपारपर्यंत सांगितले. त्यानुसार लगेच शुल्क भरल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासमोर मीटर बसविला व नवीन कनेक्शन दिले.

श्यामप्रसाद यांनी उल्हासनगरचे शाखा अभियंता गणेश रहाटे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा उल्लेख केला आणि महावितरणचे आभार मानले. त्यावेळी त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

            श्री. धनंजय औंढेकर यांनी सांगितले की, वीज ग्राहकांना नवीन कनेक्शन देण्यासाठी कल्याण झोनमध्ये २४ – ४८ ही मोहीम सुरू केली आहे. शहरी भागात २४ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज कनेक्शन देण्यासाठी नियोजन केले आहे. ग्राहकाकडून अर्ज आल्यानंतर दोन ते तीन तासात सर्व्हे करून नवीन जोडणीसाठी नेमके किती पैसे भरायचे त्याची माहिती मोबाईलवर द्यायची, ग्राहकाने घरातूनच झटपट ऑनलाईन पेमेंट करून त्याची रिसिट व्हॉट्स अपवर पाठवायची व पावती मिळाली की तातडीने मीटर बसवून नवीन वीज जोडणी द्यायची अशी कार्यपद्धती आहे. त्यासाठी कल्याण झोनमधील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. ठिकठिकाणी नव्या मीटरचा साठाही केला आहे. उल्हासनगरमध्ये एका दिवसात सहा ग्राहकांना या पद्धतीने कनेक्शन देऊन मोहीम सुरू झाली.

            मा. लोकेश चंद्र यांनी एक महिन्यापूर्वी महावितरणच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मा. उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला आहे. त्यांनी नवीन वीज कनेक्शनचे अर्ज तातडीने निकाली काढण्याची स्पष्ट सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

मा. लोकेश चंद्र यांच्या आदेशानंतर महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहा दिवसात एक लाख घरगुती वीज कनेक्शन दिली. वीज ग्राहकांना झटपट नवीन कनेक्शन देण्यावर मा. अध्यक्षांनी भर दिला आहे. त्यानुसार प्रलंबित अर्ज निकाली काढणे आणि नव्या अर्जांनुसार झटपट कनेक्शन देणे असे दुहेरी काम महावितरणने संचालक संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here