कमालचं झाली..ग्रामसेवकाची बोगस सही करून काढले सव्वा लाख रूपये

0
3
जत : जत तालुक्यातील बाज येथील
माजी सरपंच कमल संजय गडदे यांच्या काळात ग्रामसेवकाची बनावट सही करुन एक लाख ३० हजार रक्कम बँकेतून काढण्यात आली. प्रकरण अंगलट येणार असे दिसताच ते पैसे पुन्हा खात्यावर भरण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात माजी सरपंच कमल गडदे यांचे पती संजय गडदे यांचाही सहभाग आहे.संजय आनंदा गडदे हे ही बाजचे माजी सरपंच राहिले आहेत. तत्कालीन बाजचे ग्रामसेवक प्रशांत भारत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी सरपंच पती व पत्नीविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सध्या अंकले येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक प्रशांत पाटील यांच्याकडे २०२२ मध्ये बाज ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता.या दरम्यान २६ ऑगस्ट रोजी सरपंच कमल गडदे व पती संजय गडदे यांनी संगनमत करुन महाराष्ट्र बँकेच्या चेकवर ग्रामसेवक पाटील यांची बोगस सही करुन डफळापूर शाखेतील चौदाव्या वित्त आयोगाच्या बचत खात्यातून एक लाख ३० हजार इतकी रक्कम काढली.शिवाय हे प्रकरण अंगाशी येणार हे लक्षात आल्यानंतर पुन्हा ही रक्कम त्याच खात्यावर भरण्यात आली आहे.ग्रामसेवक प्रशांत पाटील यांनी १७ ऑक्टोबर रोजी बँकेचे पासबुक भरून घेतल्यावर ही रक्कम खात्यातून काढल्याचे लक्षात आले.

 

त्यांनी जतचे तत्कालीन‌ गटविकास अधिकारी यांना याबाबतचा अहवाल पाठवला. पैसे काढल्याची खात्री पटल्यानंतर वरिष्ठाच्या आदेशाने सरपंच कमल गडदे व संजय गडदे या दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. बँकेचे अधिकारीही अडचणीत तत्कालीन बाज ग्राम सेवक प्रशांत पाटील यांची सही मराठीतून असतानाही ती इंग्रजीमधून केली.सहीचे नमुने बँकेकडे असताना बँकेच्या अधिकाऱ्यांनी सहीची पडताळणी न करता चेक पास केला.सहीची खातरजमा केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरबीआयकडे बँकेच्या अधिकाऱ्यांच्या कारभाराचा अहवाल पाठवला असून यामध्ये डफळापूर शाखेतील संबधित अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.गडदे दांपत्यांवर गुन्हा दाखल होताच खळबंळ उडाली आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here