सांगलीत ऑनलाइन फसवणूक करणाऱ्याचे पावनेआठ कोटी गोठविले,सायबर पोलीसांचा दणका

0
3
ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे फसवणूक करणाऱ्याला सायबर पोलीसांनी मोठा दणका दिला आहे. सांगलीत टेलिग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून पैसे घेतलेल्या २१ लाख रुपयांचा छडा पोलीसांनी लावला.सायबर पोलीसांनी यावेळी फसवणूक करणाऱ्याच्या बँक खात्यातील तब्बल सात कोटी ८१ लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात यश मिळविले आहे,अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.

 

 

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील हर्षवर्धन विश्वासराव पाटील यांना कॅपिटालिक्स ग्रुपवरून चॅटिंग करून ऑनलाइन ट्रेडिंगबाबत माहिती देण्यात आली होती.ट्रेडिंग करण्यासाठी वेगवेगळी २० बाेगस बँक खाती त्यांना देण्यात आली होती. या खात्यावर त्यांनी २१ लाख १० हजार रुपयांची रक्कम पाटील यांनी पाठविली होती.यानंतर पाटील यांना अपेक्षित परतावा मिळण्याची प्रतीक्षा होती.यानंतर संशयितांनी त्यांना गुंतवलेली रक्कम परत मिळविण्यासाठी कर म्हणून अजून १० लाख ८५ हजार ५०० रुपये गुंतवावे लागतील, असे चॅटिंगवरच सांगितले. त्यासाठी अशी आणखी ५ बनावट खाती दिली होती.

 

 

या व्यवहाराबाबत पाटील यांना शंका आल्याने त्यांनी इस्लामपूर पोलिस ठाणे व सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता, संबंधितांची २७ बनावट खाती तपासण्यात आली. यात सर्व खात्यांवर मिळून तब्बल सात कोटी ८१ लाख रुपयांची रक्कम असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तातडीने ही सर्व खाती ‘फ्रीज’ करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी दिली.टेलिग्रामवरील ‘कॅपिटालिक्स’सह अन्यही काही ग्रुपच्या माध्यमातून अशा प्रकारची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here