जत : प्राथमिक शिक्षणासाठी पालकांचा ओढा जरी शहरी शाळांकडे असला तरीही अद्यापही ग्रामीण भागातील खेड्यांतील शिक्षणच सरस असल्याचा अहवाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नुकताच जाहीर केला.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी तिसरी,पाचवी आणि आठव्या वर्गातील अध्ययन निष्पत्तींची तपासणी केल्यानंतर हा ‘स्लॅस’ अहवाल तयार करण्यात आला, हे विशेष; परंतु ३६ पैकी १८ जिल्ह्यांची शैक्षणिक संपादणूक राज्याच्या सरासरीपेक्षाही कमी असल्याचेही या तपासणीत आढळून आले आहे.
नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या धर्तीवर (नॅस) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती पुढे आणण्यासाठी स्टेट लर्निंग अचिव्हमेंट सर्व्हे (स्लॅस) ही चाचणी २४ मार्च रोजी घेण्यात आली होती. यात मराठी आणि गणित या दोन विषयांमध्ये विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती जाणून घेण्यासाठी दीड आणि दोन तासांचा पेपर सोडवून घेण्यात आला होता.या अहवालात राज्याची मराठी विषयातील अध्ययन संपादणूक ६९.५८ टक्के, तर गणितातील संपादणूक ६०.६९ टक्के आली आहे.ग्रामीण भागातील खेड्यातील विद्यार्थ्यांची प्रगती उल्लेखनीय स्पष्ट झाली आहे.
राज्यातील अध्ययन निष्पत्तीत सुधारणा व्हावी म्हणून २४ मार्चला सर्व शाळेतून स्लॅस चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा शिक्षण निर्देशांक असेल.यामुळे शैक्षणिक सुविधा देताना किती प्रगती झाली हे तपासता आले आहे.
– अमोल येडगे, संचालक, एससीईआरटी, पुणे