मोरया…च्या जयघोषात तासगावचा रथोत्सव | लाखो भाविकांची उपस्थिती : गुलाल, खोबऱ्याची उधळण

0
1
तासगाव : मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरयाऽ मोरयाऽऽचा गजर, गुलाल-पेढे-खोबऱ्याची उधळण, जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या भाविकांच्या भक्तिरसातून उत्साहाला उधाण आलेले… अशा वातावरणात तासगावचा ऐतिहासिक 244 वा रथोत्सव बुधवारी पार पडला.
तासगावच्या श्री गणपती पंचायतनच्या रथोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. मराठा साम्राज्याचे सरसेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन रथोत्सव सुरु केला. बुधवारी या रथोत्सवाला 244 वर्षे पूर्ण झाली. श्री गणपती पंचायतनचे विश्वस्त श्रीमंत राजेंद्र पटवर्धन, डॉ. आदिती पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मोठ्या दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
 दुपारी पटवर्धन राजवाड्यातून छबिना बाहेर पडला. त्यात पटवर्धन यांच्यासह मानकरी सहभागी झाले होते. श्री गणपती मंदिरातील १२१ किलो वजनाची पंचधातूची श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून मंदिराबाहेर रथापर्यंत आणण्यात आली. रथाच्या मध्यभागी उत्सवमूर्ती विराजमान झाल्यानंतर प्रथेप्रमाणे श्रींची आरती झाली. राष्ट्रगीत झाले आणि एक वाजता रथ ओढण्यासाठी सुरुवात झाली.
 यावेळी रथापुढे असणाऱ्या लाखो गणेशभक्तांची  ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’, ‘मंगलमूर्ती मोरयाऽऽ’,
‘मोरयाऽऽ’, ‘मोरयाऽऽ’ असा अखंड जयघोष सुरू होता. भक्तिमय वातावरणात रथाचे दोरखंड हातात घेऊन भाविकांनी रथ ओढण्यास प्रारंभ केला. ‘मोरयाऽ… मोरयाऽऽ’च्या गजरात तल्लीन झालेल्या भाविकांनी जोशात रथ ओढण्यास सुरुवात केली.  फूट, दोन फूट अंतर पुढे गेल्यानंतर ओंडक्याच्या साहाय्याने रथ थांबवण्याचे काम मानकरी करत होते.  काही वेळ विश्रांती व पुन्हा ‘मोरयाऽऽ’चा गजर करीत भाविकांनी श्री काशिविश्वेश्वराचे मंदिर गाठले. स्त्री- पुरुषांचे झांजपथकातील विविध खेळ यावेळी सादर करण्यात आले. काही तरुणानी लक्षवेधी उंच मनोरे उभा करुन जयघोष केला.
केळीचे खुंट, नारळाची तोरणे, पताका, फुलांच्या माळा आदींनी रथ सजविण्यात आला होता. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या नागरिकांनी रथमार्गावर रांगोळी काढून रथाचे स्वागत केले. गणेशभक्तांना ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. संपूर्ण रथयात्रेदरम्यान रथाभोवती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रथेप्रमाणे श्री गणपती मंदिरापुढे असणाऱ्या श्री काशिविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ ओढण्यात आला. श्री शंकर व श्री गणपती या पिता-पुत्रांची भेट झाली. तिथून रथ परतीच्या प्रवासाला लागला. त्याप्रमाणे श्री काशिविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ गेल्यानंतर तेथे श्रींची आरती झाली व रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला.
दरम्यान, सकाळपासून श्रींच्या दर्शनासाठी व रथावर नारळाचे तोरण बांधण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. गणेश मंदिरात भक्तांना दर्शन घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. रथयात्रेच्या मार्गावर तसेच गुरुवार पेठ, बसस्थानक चौकापर्यंतच्या रस्त्यावर यात्रा भरली होती.
गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार सुमनताई पाटील, खासदार संजय पाटील, प्रभाकर पाटील, रोहित पाटील ,पटवर्धन कुटुंबीय आणि मानकरी यांच्यासह लाखो गणेशभक्तानी रथोत्सवात सहभाग घेतला.
सोहळा पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, तहसीलदार रवींद्र रांजणे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे नियोजन करून रथोत्सव शांततेत पार पाडला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here