दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह

0
4

जत : साडेतीन मुहूर्तापैकी ‘दसरा’ एक सण. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तसे बजेटही पूर्वीपासून असते. दसरा सणात सर्वाधिक उत्साह ऑटोमोबाईल, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी या बाजारपेठांमध्ये दिसून येतो. अनेकांनी नवीन चारचाकी आणि दुचाकी खरेदीसाठी आगाऊ बुकिंग केले आहे. दसऱ्याला गाडी घरी नेणार आहेत. शिवाय सोने खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दीची अपेक्षा आहे. फ्लॅटचे बुकिंग याच शुभमुहूर्तावर होणार आहे. सर्व बाजारपेठांचा आढावा घेतला असता यावर्षी दसऱ्याला अनेक कोटीची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

कार, दुचाकीची विक्री होणार
यावर्षी ऑक्टोबर महिन्यात वाहने खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त उत्तम आहे. अन्य दिवशी खरेदी करण्याऐवजी दसऱ्याला खरेदीकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळे बहुतांश ग्राहकांनी कार वा दुचाकीचे पूर्वीच बुकिंग केले आहे. विविध कंपन्यांची वर्षभरातील एकूण विक्रीपैकी ३० टक्के वाहनांची विक्री दसऱ्याला होणार आहे. त्यात मारुती व ह्युंडई कंपनीचा सर्वाधिक वाटा राहील. याशिवाय दुचाकीच्या विक्री मागे नाही. होंडा, हिरो, टीव्हीएस, यामाहा, बुलेट, महिन्द्र या कंपन्यांच्या शोरूममध्ये ग्राहकांनी दुचाकीचे आगाऊ बुकिंग केले आहे.

 

दसऱ्याला सोने-चांदी खरेदीची परंपरा
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची परंपरा आहे. या दिवशी प्रत्येकजण किमान एक ग्रॅम सोने विकत घेतो. सोन्याचा वाढता दर पाहता यावर्षी सराफा बाजारात मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा सराफांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केली.ग्राहकांची आवड लक्षात घेता अनेक लहानमोठ्या शोरूमने एका ग्रॅमपासून दागिने प्रदर्शित केले आहेत. जास्त वजनाचे दागिने खरेदी करण्यासाठी अनेकांनी आधीच आर्डर दिली आहे. त्या दिवशी दागिने घरी नेतील. यादिवशी चांदीचे ताट, वाटी, ग्लास आणि भेटवस्तूंना मोठी मागणी असते.

 

इलेक्ट्रॉनिक्स बाजारात गर्दी
गेल्या काही वर्षांत अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यात मोबाईल, एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन आदींचा समावेश आहे. अनेकांनी पूर्वीच शोरूमला भेट देऊन उपकरणाचे बुकिंग केले असून दसऱ्याच्या मुहूर्तावर घरी नेणार आहे. बँका आणि खासगी आर्थिक संस्थांच्या शून्य टक्के योजनांमध्ये ग्राहकांची खरेदी सुलभ झाली आहे. याशिवाय दसऱ्याला लॅपटॉप खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक कंपन्यांनी विविध उत्पादनांच्या खरेदीसाठी उपलब्ध योजनांचे पोस्टर शोरूममध्ये लावले आहे.ब्रॅण्डेड उत्पादने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे त्यांनी सांगितले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here