स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वर्ष आपण नुकतेच साजरे केले. ते करीत असतानाच केंद्र सरकारने पुढील २५ वर्षांतील देशाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्याचा संकल्प केला आहे. राज्य शासनाचाही या उपक्रमात सहभाग आहे. आता देशाच्या विकासाचा आराखडा तयार करायचा असेल तर त्याची सुरुवात अगदी गाव, तालुका आणि जिल्हा पातळीपासूनच केली पाहिजे. तीच संकल्पना या मोहिमेमागे आहे. या अनुषंगाने विविध क्षेत्रनिहाय उपसमित्या करण्यात आल्या आहेत. त्यातील एक उपसमिती सांगली जिल्ह्याचा पर्यटन आणि सांस्कृतिक विकास आराखडा तयार करत आहे. या पार्श्वभूमिवर या क्षेत्रातील सांगली जिल्ह्याची बलस्थाने अधोरेखित आणि उणिवा दूर करण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांनी केलेला उहापोह…
सांगली शहर किंवा जिल्ह्यात पाहण्यासारखं काय आहे, असा प्रश्न काहीजण सातत्याने विचारतात. असा प्रश्न विचारणाऱ्यांना’ तुझं आहे तुजपाशी, परंतु जागा चुकलासी’ असंच म्हणावं वाटतं. खरं तर सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्र या दृष्टीने सांगली शहर तसेच सांगली जिल्हा यांची काही बलस्थाने आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगली ही नाट्यपंढरी आहे. मिरज ही आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते. चांदोली आणि सागरेश्वर अभयारण्यासारखी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ यासारख्या आशिया खंडामध्ये सुद्धा अवाढव्य मानल्या जाणाऱ्या उपसा जलसिंचन योजना आहेत. या जिल्ह्यात सांगली शहर, मिरज, वाळवा तालुक्यातील बोरगाव, पलूस तालुक्यातील औदुंबर अशा ठिकाणचा कृष्णाकाठ, तसेच ३४.५० टीएमसी पाणी साठवणारे चांदोली धरण आहे, हेही पर्यटकांना अवगत होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याला मोठा इतिहास आहे.
जिल्ह्यात तीर्थक्षेत्र विकासाचे मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे. मिरजेतील मिरासाहेब दर्गा, मिरजेजवळचा श्री दंडोबा डोंगर परिसर, सांगलीतील ऐतिहासिक श्री गणेश मंदिर, तासगावमधील गोपूर पद्धतीचे शिखर असलेले श्री गणेश मंदिर, आरेवाडी येथील श्री बिरोबा मंदिर आणि परिसर, जत तालुक्यातील बनाळी येथील श्री बनशंकरी, गुड्डापूर आणि मुचंडी येथील देवस्थाने, आटपाडी तालुक्यातील स्वतंत्रपूर येथील खुले कारागृह, खानापूर तालुक्यातील बाणूरगड आणि शुकाचार्य मंदिर, रेणावीजवळचे श्री रेवणसिद्ध मंदिर, कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथील श्री चौरंगीनाथ मंदिर परिसर, श्री सागरेश्वर अभयारण्य, पलूस तालुक्यातील श्रीक्षेत्र औदुंबर, वाळवा तालुक्यातील कोळे नरसिंगपूर आणि बहे येथील रामलिंग बेट येथील प्राचीन मंदिरे, शिराळा तालुक्यातील ऐतिहासिक मारुती मंदिर, श्री गोरक्षनाथ मंदिर तसेच चांदोली अभयारण्य आणि परिसर, प्रचितगड अशा अनेक क्षेत्रांचा तीर्थक्षेत्र पर्यटन म्हणून विकास करता येईल.
सांगली जिल्हा ही कृषिपंढरी म्हणून सुद्धा ओळखला जातो. जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, हळद, भाजीपाला अशी प्रमुख पिके घेतली जातात. यापैकी द्राक्षांवर प्रक्रिया करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा बेदाणा बनवला जातो. डाळिंबे विदेशात निर्यात होतात. हळदीची मोठी बाजारपेठ सांगलीमध्ये आहे. त्याशिवाय हळदीचे उत्पादनही होते. हळदीपासून हळद पूड करण्यापर्यंतची प्रक्रिया येथे केली जाते. द्राक्षांपासून बेदाणा कसा तयार होतो ही प्रक्रिया खरोखरच लक्षवेधी अशी असते. अशा शेतांमध्ये तसेच बेदाण्याची शेड असलेल्या नागज परिसरात एक, दोन दिवसाची चांगली सहल आयोजित करण्यासारखी ठिकाणे आहेत. त्यामुळे कृषि पर्यटनाच्या दृष्टीनेसुद्धा सांगली जिल्ह्याचा विकास झाला तर खूप उत्तम आहे.
आशिया खंडातील महत्त्वाच्या आणि मोठ्या मानल्या जाणाऱ्या ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू अशा तीन मोठ्या उपसा जलसिंचन योजना सांगली जिल्ह्यातच आहेत. प्रचंड क्षमतेच्या विद्युत मोटारी आणि पंपांच्या ताकदीवर एका भागातून कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे नेले जाते हा सुद्धा एक कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय ठरू शकतो. ह्या योजनांचे कामकाज पाहणे हा सुद्धा पर्यटकांच्या दृष्टीने एक मोठा आनंदाचा आणि माहितीचा ठेवा होऊ शकतो. त्या दृष्टीनेही येथे प्रयत्न व्हावेत.
सांस्कृतिक क्षेत्राचा विचार केला तर सांगली शहरात इसवी सन १८४३ मध्ये पहिले मराठी नाटक रंगभूमीवर सादर झाले होते. सांगली जिल्ह्याला तमाशाची, लोकनाट्याची आणि सोंगी भजनाचीही मोठी परंपरा आहे. अनेक नामवंत साहित्यिकांनी सांगली जिल्ह्याचे नाव गाजवले आहे. याचबरोबर आता काही मालिका, चित्रपटांचेही चित्रीकरण सांगली जिल्ह्यात होऊ लागले आहे. ही सर्व माहिती देणारी एखादी सहल सांगली जिल्ह्यासाठी आयोजित करता येईल.
वीणा, सतार, तंबोरा, रुद्रवीणा वेळा अशी वाद्ये लोकांना माहीत असतात. पण ती वाद्ये कशी तयार होतात, त्यासाठी कोणते साहित्य वापरले जाते, ही वाद्ये करणारे परंपरागत कारागीर कोण आहेत, याची माहिती लोकांना नसते. ही माहिती जर व्हायची असेल तर मिरज उत्तम ठिकाण आहे.
काही मोठ्या शहरांमध्ये पर्यटनासाठी म्हणून काही स्पॉट गेल्या काही वर्षात खूपच नावारूपाला आले आहेत. ते केवळ प्रसिद्धीमुळे. एखाद्या वाहत्या नदीचे पात्र, एखादे लहानसे धरण, एखाद्या ओढ्याच्या काठावर असलेला बंगला, गावाबाहेरची एखादी टेकडी किंवा दिवाळीच्या सुमारास फुलणारे फुलांचे ताटवे यांना पर्यटकांच्या दृष्टीने प्रचंड महत्त्व आले आहे. पाच ते सात टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या धरणांवर अनेक ठिकाणी अक्षरश: लोकांची झुंबड उडते. असे अनेक स्पॉट सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी आढळतील.
सांगली जिल्ह्याच्या या बलस्थानांची पुरेशी प्रसिद्धी होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर पर्यटकांना उत्तम दळणवळण व्यवस्था उपलब्ध करून देणे, परगावातून सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळांसाठी विशेष बस सुरू करणे अशी कामे ही शासनाच्या कक्षेत येतात. परंतु सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांनीही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पर्यटकांसाठी उत्कृष्ट निवास व भोजन व्यवस्था उपलब्ध होणे आवश्यक आहे. परस्परांच्या समन्वयाने सांगली जिल्ह्याची ओळख राज्यभर कशी वाढवता येईल असा प्रयत्न केला पाहिजे. तरच २५ वर्षानंतर सांगली जिल्हा समृद्ध असे ठिकाण होऊ शकेल.
सांस्कृतिक विकास आणि पर्यटनाबरोबर समृद्धीही येत असते. कारण अखेरीस या दोन्ही गोष्टी स्थानिक बाजारपेठेबरोबरही जोडल्या जातात. त्यामुळे आपोआपच त्या त्या ठिकाणच्या स्थानिक कलावंतांना, कारागिरांना आणि व्यावसायिकांना रोजगार मिळतो. त्यामुळे त्या परिसराचा आर्थिक विकासही होतो, हे आपल्याला विसरता येणार नाही. त्यामुळे जे आपल्याकडे आहे त्याचा तरी चांगला उपयोग करून घेता येईल.
सन २०४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा शत संवत्सरीक महोत्सव आपण साजरा करणार आहोत. त्यावेळी भारत विकासाच्या टप्प्यावर कसा असेल असा विचार करून हा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यावेळच्या विकासाचे जे चित्र तयार होईल, त्याची सुरुवात आज आपण करीत आहोत. केंद्र आणि राज्य शासनाचा हा दृष्टीकोन खरोखरच कौतुकास्पद असा आहे. ‘भारत एक खोज’ या उपक्रमाच्या धर्तीवरच ‘जिल्ह्याचा शोध’ या स्वरूपाचा हा आराखडा असेल असे वाटते. सांगलीकर म्हणून नागरिकांच्या सूचनांचे स्वागत जिल्हा प्रशासन करत आहे. आपणासही काही सूचना करावीशी वाटली तर श्री. सचिन निकम, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली यांच्याशी संपर्क साधावा.
चिंतामणी सहस्रबुद्धे, ज्येष्ठ पत्रकार