अवैध वाळू वाहतूकीची माहिती दिल्याचा रागातून पोलिस पाटलास मारहाण,चौघाविरोधात गुन्हा दाखल

0
3

जत : जत तालुक्यातील पांढरेवाडी येथे चालू असलेल्या वाळू तस्करीची माहिती प्रशासनाला दिल्याच्या रागातून पोलिस पाटील धर्मराज बाळाप्पा शिंदे (वय ४६) यांना चौघांनी काठीसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याच्या कारणावरून संशयित चौघावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

संशयित आरोपी श्रीमंत कामा करपे, मल्हारी जयाप्पा करपे, जयाप्पा कामा करपे, महादेव बाबू तांबे (सर्व रा. पांढरेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. पोलिस पाटील शिंदे हे दरीबडची व संख गावाकडे जाणाऱ्या रोडजवळ थांबून अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीची माहिती संख अपर तहसीलदार यांना मोबाईलवरून देत होते.

यावेळी संशयितांनी पोलीस पाटील धर्मराज पाटील यांनी पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून येऊन अवैद्य वाळू उपसा वाळू वाहतुकीची माहिती अपर तहसीलदार यांना देऊ नको, असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर झालेल्या वादावादीत फिर्यादीस काठीने डोक्यात मारहाण करून जखमी केले. लाथाबुक्क्याने मारहाण करून, शिवीगाळ दमदाटी केली. तहसीलदार व पोलिस ठाण्याच्या परवानगीने पोलिस पाटील धर्मराज पाटील यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

दरम्यान अवैध वाळू वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिस पाटील यांना मारहाण होत आहे.या घटनेचा पोलिस पाटील संघटनेकडून निषेध व्यक्त केला आहे. तसेच वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल आणि पोलिसांनी एकत्रित कारवाई करावी अशी मागणी पोलिस पाटील संघटनेने केली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here