सध्याचे युग हे ऑनलाईन युग आहे असे म्हटले जाते. कारण आज सर्वकाही ऑनलाईन खरेदी करता येते आणि ऑनलाईन विकताही येते. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे या फोनमध्ये वस्तूंची ऑनलाईन विक्री करणारे किमान ४-५ अँप्स तरी नक्कीच आहेत. पाण्याच्या बाटलीपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत सर्वच वस्तू, खाद्यपदार्थ ऑनलाईन पद्धतीने आणि तेही सवलतीच्या दरात घरपोच मागवता येतात. हल्ली तर ताज्या भाज्या आणि ताजी फळेही ऑनलाईन मिळू लागली आहेत, त्यातही तुम्हाला ती सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली हवी असतील, तर तशी सुविधाही उपलब्ध आहे.

शहरासारख्या ठिकाणी लोकांकडे पैसे जास्त आणि वेळ कमी असल्याने बाजारात जाऊन वस्तूंची निवड करणे आणि त्यांची खरेदी करण्यासाठी गर्दीतून वाट काढत जाणे, दुकानदाराशी भावतोल करणे वेळकाढूपणाचे वाटू लागले आहे. कधीतरी विरंगुळा म्हणून विंडो शॉपिंग ठीक आहे, मात्र गरजेच्या वस्तू मागवण्यासाठी हल्ली ऑनलाईन संकेतस्थळांनाच प्रथम पसंती मिळू लागली आहे. अर्थात आजही ऑनलाईन शॉपिंग करणारा एक विशिष्ट्य वर्ग असून त्याची संख्या दिवसागणिक कमालीची वाढू लागली आहे. त्यातही ऑनलाईन खरेदी व्यवहारात फसवणूक झाली नसेल तर ऑनलाईन खरेदीवरील विश्वास अधिक दृढ होऊन अधीकाधीक वस्तू ऑनलाईन मागवण्याकडेच अशांचा कल असतो. रोजच्या घरच्या जेवणाचा कंटाळा आला असेल, तर हॉटेलमधील लज्जतदार जेवण घरी ताटापर्यंत आणून देणारी स्विगी-झोमॅटो सारखी संकेतस्थळे दिवसातील २४ तासांपैकी झोपेचे ७-८ तास वगळता उरलेला वेळ आपल्या सेवेसाठी तत्पर असतात.

किराणा माल, इलेक्टॉनिक वस्तू, घरातील भांडी-कुंडी, फर्निचर, औषधे, पुस्तके, शोभेच्या वस्तू, भेटवस्तू, सर्व प्रकारचे कपडे, बेडशीट, सौंदर्य प्रसाधने, पूजेचे साहित्य सर्व काही ऑनलाईन उपलब्ध करून देणारी असंख्य संकेतस्थळे आज कार्यरत असून त्यामध्ये नवनवीन संकेतस्थळांची भरच पडत आहे. सणांच्या निमित्ताने केली जाणारी खरेदीही हल्ली ऑनलाईन पद्धतीनेच होऊ लागली आहे. वाढती ग्राहक संख्या लक्षात घेता या संकेतस्थळांमध्ये आपसांत कमालीची स्पर्धा सुरु असते. त्यासाठी प्रत्येक संकेतस्थळांकडून विविध ऑफर्स आणि सवलती दिल्या जातात. १५ मिनिटे ते २४ तासांत डिलिव्हरी देण्याचे आश्वासन दिले जाते. पूर्वी केवळ सणांच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती महिन्यातील मोजके दिवस सोडल्यास वर्षभर चालूच असतात. ‘विंटर सेल’, ‘समर सेल’, ‘हाऊसफुल सेल’, ‘धमाका ऑफर’ यांसारख्या वेगवेगळ्या गोंडस नावांनी ग्राहकांना आकर्षित करण्याची स्पर्धा या संकेतस्थळांवर बाराही महिने सुरु असली, तरी त्यामधून लाभ हा ग्राहकाचाच होतो ही एक जमेची बाजू आहे. या ऑनलाईन कंपन्या थेट उत्पादक कंपन्यांकडून उत्पादने घेत असल्याने त्यांना ती अत्यंत अल्प दरात मिळतात त्यामुळे ग्राहकांना ती आपला लाभ वजा करून स्वस्त दरात देणे त्यांनाही परवडते. या सर्वांचा परिणाम परंपरागत व्यवसाय करणाऱ्यांवर होऊ लागला आहे, हे जरी सत्य असले तरी ऑनलाईन खरेदीत लोकांचे ४ पैसे वाचत असल्याने त्यांचा अधिक कल त्याकडेच असतो.
ऑनलाईन वस्तू पुरवणाऱ्या संकेतस्थळांची आणि त्यावर खरेदी करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढल्याने खरेदी केलेल्या वस्तूंची घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. या कंपन्यांना कामगारांची सतत निकड असल्याने याठिकाणी सातत्याने भरती सुरु असते. स्वतःची दुचाकी असेल आणि थोडेफार इंग्रजी वाचता येत असेल, तर या डिलिव्हरी कंपन्या तुम्हाला हमखास नोकरीला ठेवतात. यानिमित्ताने तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. कोरोना काळात अनेक खासगी कंपन्या बंद पडल्याने तरुणांवर बेरोजगारीचे मोठे संकट ओढवले होते. त्याच काळात ऑनलाईन खरेदी करून घरपोच वस्तू पुरवणाऱ्या संकेतस्थळांना ‘अच्छे दिन’ आले असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला. या प्रतिकूल काळात ज्यांच्या नोकऱ्या गेल्या अशा आयटी ईंजिनिअर्सनीही डिलिव्हरी बॉय म्हणून नोकऱ्या केल्या आहेत. डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी कारण्याठी विशेष शैक्षणिक अर्हता गरजेची नसल्याने भरती होणारे कर्मचारी कोणत्या प्रवृत्तीचे आहेत आणि कुठल्या ठिकाणाहून आले आहेत याची विशेष खबरदारी या डिलिव्हरी कंपन्यांकडून घेतली जात नसल्याचे काही ठिकाणी लक्षात आले आहे.
डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडे आपला पत्ता आणि मोबाईल क्रमांक असल्याने या पत्याचा आणि मोबाईल क्रमांकाचा गैरवापर केला गेल्याच्या अनेक घटना मध्यंतरी उघडकीस आल्या. आर्थिक फसवणुकीचे आणि ब्लॅकमेलींगचे अनेक प्रकार घडले. ऑनलाईन ग्रोसरी आणि साहित्य पुरवणाऱ्या एका कंपनीच्या शहजाद शेख नामक डिलिव्हरी बॉयने मुंबईतील खार येथील एका ग्राहक युवतीचा विनयभंग केल्याची घटना गतवर्षी घडली होती. याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात नोएडा येथे ऑनलाईन मागवलेले किराणा सामान घेऊन गेलेल्या डिलिव्हरी बॉयने घरात तरुणी एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ठाण्यात एका डिलिव्हरी बॉयने पाणी पिण्याच्या निमित्ताने घरात प्रवेश मिळवला आणि घरातल्यांना चाकूचा धाक दाखवून १० लाखांचा ऐवज लंपास केला होता, याच वर्षी सप्टेंबर महिन्यात पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉयने ग्राहक तरुणीकडे चक्क शरीरसुखाची मागणी केली होती. नाशिकमध्ये एका गृहस्थांनी मागवलेले ४ लाख किमतीचे आयफोन डिलिव्हरी बॉयने परस्पर लंपास केल्याची घटना याच वर्षी जून महिन्यात घडली(असे अनुभव अनेकांना आले आहेत.)याशिवाय पाणी पिण्याच्या, मोबाईल चार्ज करण्याच्या बहाण्याने घरात घुसून घरातील मौल्यवान साहित्य पळवणे, दाराबाहेरील शोभेच्या वस्तू, शूज पळवणे, ग्राहकांशी हुज्जत घालणे, ग्राहकांना मारहाण करणे यांसारखे अनेक प्रताप डिलिव्हरी बॉईजने केलेले आहेत.
अर्थात या सर्व नकारात्मक घटना असल्या, तरी उन्हातान्हात, थंडी पावसात ग्राहकांचे पत्ते शोधत ग्राहकांना घरपोच वस्तू पोहोचवण्याचे कष्टाचे कामही हेच डिलिव्हरी बॉईज करत असतात. त्यांच्या मेहनतीच्या आणि प्रामाणिकपणाच्याही अनेक कथा आहेत. ऑनलाईन वस्तू मागवणाऱ्या ग्राहकांसाठी डिलिव्हरी घेऊन येणारा इसम हा अनोळखी असतो त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. ऑनलाईन मागवलेली वस्तू घरपोच मिळत असल्याने अनेकदा ती घेण्यासाठी इमारतीचे दोन मजले उतरण्याची किंवा घराबाहेर रस्त्यावर येण्याची तसदीही आपण घेत नाही. वस्तू दारात मिळण्याचा आपला अट्टाहास असतो. एरव्ही मोबाईलवर आलेला अनोळखी क्रमांक पाहून फोन न स्वीकारणारे आपण अनोळखी डिलिव्हरी बॉयला थेट घरापर्यंत बोलावतो. सर्वच डिलिव्हरी बॉय प्रामाणिक असतात असे नव्हे. ज्या वस्तू आपण सहज घरी घेऊन जाऊ शकतो त्या वस्तू थेट दारापर्यन्त मागवण्याची आवश्यकता आहे का ? इमारतीच्या खाली किंवा जवळच्या रस्त्यावर जाऊन त्या घेण्याचा त्रास आपण का घेत नाही ? वस्तू घरपोच मागवताना आपण सोबत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची असुरक्षितताही घेऊन येत आहोत याचेही भान असायला हवे,
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०