महाराष्ट्रभूमीला जसा शौर्याचा आणि पराक्रमाचा वारसा लाभला आहे तसा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ठेवाही लाभला आहे. महाराष्ट्राला साधू संतांची भूमी असे म्हटले जाते. वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे सर्वात मोठे भूषण आहे आणि आषाढी-कार्तिकी एकादशीनिमित्त केली जाणारी पंढरपूर वारी हा राज्यातील सर्वात मोठा महोत्सव असतो. वारकरी संप्रदायाने या महाराष्ट्राला अनेक संत दिले. विठुरायाच्या भक्तीत लिन होऊन या संतांनी साक्षात विठुरायाला प्रसन्न केले. विशेष म्हणजे जात पात यांच्या पलीकडे भक्ती असते याचा प्रत्यक्ष अनुभव विठुरायाने आपल्या भक्तांना दिला आहे. ज्या काळात स्पृश्य- अस्पृश्यता पाळली जात होती, गरीब श्रीमंती भेदाभेद होता त्याही काळात विविध जातीचे विठुरायाचे भक्त संतपदी विराजमान झाले आहेत. पिढीजात श्रीमंतापासून अत्यंत गरीबही आपल्या भक्तीच्या बळावर विठूमाऊलीला प्रिय ठरला आहे. भगवंताच्या दरबारात जाती पातीला, गरीब श्रीमंती भेदभेदाला कवडीचीही किंमत नाही हेच भगवंताने या उदाहरणांतून दाखवून दिले आहे. विठुरायाच्या भक्तीमध्ये लिन होताना आलेल्या अनुभूती आणि मिळालेले ज्ञान या संत मंडळींनी अभंग, ओवी, गवळण आणि भारूड यांच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीसाठी साध्या सरळ शब्दांत मांडून ठेवले. या संतांचे साहित्य वाचले कि अध्यात्म किती सोपे आहे याची जाण होते.
या समस्त ज्ञानगंगेचे सार म्हणजे भगवंताचे नामस्मरण ! ज्ञानेश्वर माउली म्हणतात ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा l पुण्याची गणना कोण करी ll ‘.तर तुकोबाराय सांगतात ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे l जळतील पापे जन्मांतरीची ll’ सर्वच संतांनी नामस्मरणाची महती त्यांच्या त्यांच्या शब्दात वर्णिली आहे. भगवंताच्या प्राप्तीचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरण. वारकऱ्यांना वारीमध्ये शेकडो मैलाचे अंतर चालण्याचे बळ देणारे माध्यम सुद्धा श्री विठ्ठलाचे नाम तर आहे. कलियुगातील हीच सर्वोत्तम साधना आहे, त्यामुळे संतांनी नामाचे महत्व जागोजागी अधोरेखित केले आहे. संत सावता माळी यांनी पंढरीला न जाताही नामाच्या बळावर श्री विठ्ठलाला प्रसन्न केले. नामसाधना अशी साधना आहे जिला वेळेचे, स्थानाचे आणि काळाचे बंधन नाही. ‘रामसे बडा रामका नाम’ हे प्रत्यक्ष श्रीरामांनीही वानरसेनेच्या माध्यमातून साऱ्या जगाला दाखवून दिले. अर्जुनाचा अंतर्मनात श्रीकृष्णाचा जप अखंड चालू असे त्यामुळे त्याने सोडलेला बाण लक्ष्यभेद घेई. छत्रपती शिवाजी महाराज सदैव ‘जगदंब जगदंब’ असा जप करत ज्याच्या सामर्थ्यावर त्यांना पातशाह्यांविरुध्द लढण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी अध्यात्मिक बळ मिळाले.
आजमितीला राज्यातील अनेक ठिकाणी मंदिरांतून, मोठमोठ्या मैदानातून विविध महाराज आणि कीर्तनकार यांची कीर्तने, हरिनाम सप्ताह चालू आहेत. या कार्यक्रमांना हजारोंची गर्दी असते. कीर्तन जरी भागवतावर अथवा रामायणावर असले तरी या सर्वाचे सार ‘नाम’ हेच असते. या किर्तनांत लोक माना डोलावताना, लिन होताना दिसतात मात्र यांपैकी किती जण कीर्तनाचे सार म्हणजेच ‘नाम’ घेण्याचा प्रत्यक्षात प्रयत्न करतात. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. श्रवणभक्तीला अध्यात्मात अल्प महत्व आहे, तर प्रत्यक्ष कृतीला अधिक महत्व आहे. कीर्तनात येऊन ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा’ म्हणत माना डोलवल्या आणि हरीचे नाम घेण्याचा प्रयत्नच केला नाही, तर देव कसा आपल्याला जवळ करेल ? त्यामुळे कीर्तन प्रवचन हे केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम नसून कृतिला प्रवृत्त करण्याचे साधन आहे, घरी चित्रपट आणि सासू सूनांचे कार्यक्रम पाहत बसण्यापेक्षा कीर्तन प्रवचनांना जाणे नक्कीच श्रेष्ठ आहे; मात्र अध्यात्मात पुढे जायचे असेल, त्यातील आनंद मिळवायचा असेल, तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. हरिपाठ हजारदा म्हटला आणि माऊलीने सांगितलेले हरी नाम घेतलेच नाही तर माउलींना तरी आवडणार आहे का ? नामस्मरण हा साधनेचा पाया आहे त्यामुळे अध्यात्माची गोडी चाखायची असेल तर नियमितपणे नामस्मरण करण्याला पर्याय नाही.
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०