हॉटेलवरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने २५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्या घराची झडती घेतली असता सुमारे ८० लाखांचे सोन्याचे दागिने, साडेतीन लाखांचा हिऱ्यांचा हार यांसह साडेतीन लाख रुपये रोख असे घबाड सापडले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने एक आलिशान गाडीही जप्त केली. एका हॉटेल व्यावसायिकाकडील अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी देशमुख यांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिकावर कोणतीही कारवाई न करण्याचा मोबदल्यात देशमुख यांनी त्याच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. हॉटेल व्यावसायिकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवून देशमुख यांना पकडून दिले.
भ्रष्टाचाराचे कुरण झालेल्या मोजक्या विभागांपैकी एक असलेल्या अन्न आणि औषध विभागातील भ्रष्टाचार म्हणजेच थेट जनतेच्या जीवाशी खेळ. अन्नधान्यातील भेसळ, हॉटेल आणि उपहारगृहांतील अन्नपदार्थांत केला जाणारा भेसळयुक्त पदार्थांचा वापर, मिठाई बनवण्यासाठी लागणाऱ्या मावा उत्पादनांत केली जाणारी भेसळ, दुधासह दुग्धजन्य उत्पादनांच्या निर्मितीतील भेसळ, पाकिटबंद पदार्थ तयार करण्यासाठी केला जाणारा आरोग्याला हानिकारक रसायनांचा वापर यांशिवाय औषध उत्पादनांतील घातक आणि उत्तेजक रसायनांचा वापर या सर्व बाबी या खात्याच्या अंतर्गत येतात ज्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. भेसळयुक्त आणि रासायनिक पदार्थांचा वापर केलेले पदार्थ खाऊन विषबाधा तर होऊ शकतेच शिवाय अशा पदार्थांच्या नियमित सेवनाने हृदय, किडनी, यकृत, मूत्रपिंड यांसारख्या अंतर्गत अवयवांना इजा पोहोचू शकते, रक्तदाब, हृदय विकार आणि कर्करोग यांसारखे जीवघेणे विकार जडू शकतात.
हल्ली कमी उत्पादन खर्चामध्ये अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी अन्नपदार्थांमध्ये सर्रास भेसळ केली जाते, घातक रासायनिक घटकांचा वापर केला जातो. या सर्वांवर प्रतिबंध आणून नागरिकांना सकस, पोषक आणि शुद्ध अन्नपदार्थ मिळतील यासाठी प्रयत्न करणे हे या विभागाचे प्रमुख कार्य आहे. मात्र याच विभागातील अधिकारी आपल्या स्वार्थासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना रान मोकळे करून देत असतील तर अशांना कठोरात कठोर शासन होणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारी अधिकारी आणि भ्रष्टाचार हे समीकरण राज्यासह देशभरात प्रचलित झाले आहे. लाच दिल्याशिवाय सरकार दरबारी जमा केलेली कागदपत्रे, फाईल्स पुढे सरकतच नाहीत याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. लाच देणारे देतात म्हणूनच घेणाऱ्यांचे फावते असेही काहीजण म्हणतात. हुंडा घेणे आणि देणे दोन्हीही गुन्हेच आहेत तसे लाच देणे आणि घेणे दोन्हीही गुन्हेच आहेत. अल्प वेळेत आणि अल्प श्रमात सरकार दरबारी काम करून घ्यायचे असेल तर लाच द्यावीच लागते ही प्रथा आज सरकार दरबारी रूढ झाली आहे. कर्तव्यभावनेला तिलांजली देऊन जडलेल्या भ्रष्टाचाराच्या सवयीमुळे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांमध्ये काम टाळण्याची वृत्ती निर्माण होत आहे. सामान्य नागरिकांच्या मासिक वेतनातून कररूपाने सरकार दरबारी जाणाऱ्या पैशातून ही अधिकारी मंडळी गलेलठ्ठ वेतन घेत असतात. तरीही यांची भूक भागत नाही म्हणून त्याच अन्नदात्याच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्याला लुबाडतात. शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत भ्रष्टाचाराची एकसंध साखळी असल्याने खालचा अधिकारी कामाचे पैसे मागतो म्हणून वरच्या अधिकाऱ्याकडे तक्रारही करता येत नाही. सरळमार्गाने काम करून घायचे असेल, तर त्यासाठी सरकार दरबारी अनेकदा चकरा माराव्या लागतात. पुन्हा पुन्हा कामाचे खाडे नकोत म्हणून सामान्य नागरिक अधिकाऱ्याच्या मागणीप्रमाणे पैसे देतो आणि आपला वेळ वाचवतो, अशा प्रकारची ही प्रक्रिया सरकारी कार्यालयांत अविरतपणे सुरु असते. सामान्य नागरिक वेळ आणि कार्यालयाच्या सुट्या वाचवण्यासाठी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असतो. अर्थात या भ्रष्ट क्षेत्रामध्येही काही कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर अधिकारी असतात; मात्र यांची संख्या तुलनेने कमी असल्याने सरकारी कार्यालयांत भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनला आहे.
सरकार दरबारी काम होण्यासाठी दिलेला पैसा हा सामान्य नागरिकांच्या मेहनतीचा आणि प्रामाणिकपणे काम केल्याचा मोबदला असतो. इच्छा नसतानाही तो इतरांना बहाल करताना त्यामागे त्याचा तळतळाटसुद्धा असतो त्यामुळे भ्रष्टाचाऱ्याच्या तो कितपत पचनी पडणार ? अध्यात्मशास्त्रानुसार वैयक्तिक स्वार्थासाठी गैरमार्गाने इतरांकडून धन लुबाडणे हे फार मोठे पाप असून त्याच्या फळस्वरूपात लुबाडणाऱ्याची या नाहीतर पुढील जन्मात निश्चितपणे कित्येक पटीने हानी होते. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा अक्षय कुमार अभिनित ‘गब्बर इज बॅक’ नावाचा हिंदी चित्रपट मध्यंतरी आला होता. प्रत्येक सरकारी विभागातील दहा भ्रष्ट अधिकाऱ्यांना गब्बर ताब्यात घेतो आणि त्यापैकि एकाला ठार करून तो सार्वजनिक स्थळी लटकवतो आणि अन्य नऊ जणांना समज देऊन सोडतो. त्याच्या या कृतीमुळे त्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांना योग्य ती समज मिळून ते सूताप्रमाणे सरळ होतात. गब्बर करत असलेली कृती कायद्याने चुकीची असली तरी त्याच्या या कृतीमुळे समाजातील भ्रष्टाचार नष्ट होत चालल्याने युवकांसह सामान्य नागरिकांचा त्याला पाठिंबा मिळतो. आजमितीला राज्यासह देशातील भ्रष्टाचार इतका कमालीचा वाढला आहे कि प्रत्यक्षात एखादा गब्बर इथेही अवतारवा असे सामान्य नागरिकांना आज वाटत आहे.
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०