सांगलीत संजय पाटील पराभवाच्या छायेत | पक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आतापर्यंत 46 हजार मतांचे मताधिक्य : वारं फिरल्याची प्रचिती

0
11

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील पराभवाच्या छायेत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. आतापर्यंत दहा फेऱ्यांचा निकाल हाती आला आहे. यामध्ये विशाल पाटील यांना तब्बल 46 हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे.

विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात ‘वारं फिरलंय’, अशी टॅगलाईन वापरून त्यांनी प्रचारास सुरुवात केली. आजच्या निकालावरून खरोखरच हे वारं फिरलं असल्याची प्रचिती येत आहे.

भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांना फक्त तासगाव मतदारसंघातून आघाडी मिळताना दिसत आहे. इतर सर्व विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा बोलबाला दिसून येत आहे. संजय पाटील हे गेली दहा वर्षे भाजपचे खासदार आहेत. यावेळी हॅट्रिक करण्याच्या तयारीत ते होते मात्र भाजपमधील अनेकांना त्यांनी अंतर्गत शत्रू करून घेतले होते. त्यामुळे अनेकांनी यावेळी त्यांचे काम केले नाही. त्याचाच परिणाम म्हणून सध्या 10 फेऱ्याअखेर ते सुमारे 46 हजार मतांनी पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

हा ट्रेंड जर असाच राहिला तर संजय पाटील यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सुरुवातीपासूनच विशाल पाटील आघाडीवर आहेत. त्यांच्या समर्थकांनी जिल्हाभरात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू केली आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांना हा निकाल जोरदार धक्का देणारा आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here