जत : राज्य शासनाने आषाढी वारीसाठी निघालेल्या दिंडयासाठी २० हजाराचे अनुदान तसेच दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना गटविमाचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे. राज्य शासनाने आषाढी वारीला जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आषाढी वारीपुरता न घेता आषाढी, कार्तिकी, चैत्र, माघ या चारही वारीतील वारकऱ्यांना अपघात विमा मिळावा व अनुदान मिळावे अशी मागणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा यांनी पत्रकारांशी बोलताना केली.तुकाराम बाबा म्हणाले, पंढरीतील विठुरायाच्या दर्शनाला लाखोंची गर्दी असते.वारकऱ्यांसाठी दिंडी हा तर सोहळाच. या दिंडीत लाखोच्या संख्येने भाविक सहभागी होतात.
संपूर्ण महाराष्ट्रातुनच नव्हे तर शेजारील कर्नाटकासह देशभरातून भक्त पंढरीच्या दर्शनाला व वारीत सहभागी होतात. हातात भगवा पताका घेत, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पायी दिंडी काढत विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्याची संख्याही मोठी आहे. पायी निघालेल्या या दिंडीत रस्त्यावरून जाणारे भरघाव वाहन घुसल्याने अनेक अपघात झाले. असंख्य वारकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन वर्षांपूर्वी नागजजवळ असावं मोठा अपघात घडला होता त्या अपघातात अनेकांचे जीव गेले.
वारीत वाहन घुसून अपघात झाल्यानंतर पायीदिंडीने निघालेल्या वारकऱ्यांना विमा संरक्षण द्यावे अशी मागणी आपण तेव्हापासून शासन, प्रशासनाकडे लावून धरली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही आपण भेट घेत वारकऱ्यांना अपघात विमा मिळावा अशी मागणी केली होती. या पाठपुराव्याला, मागणीला यश आले असून आषाढी वारीला निघणाऱ्या वाहनांना टोल माफ, दिंडीला २० हजार अनुदान व अपघात विमा काढण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निश्चितच अध्यात्मिक कार्याला बळ देणारा आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या घेतलेल्या निर्णयाचे आम्ही श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने मनःपूर्वक असं स्वागत व अभिनंदन करतो.आषाढी वारीप्रमाणेच अन्य वारी आहेत त्यांनाही हा नियम लागू करावा अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची आपण भेट घेणार असल्याची माहिती तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली