श्री गणेशाचे रूप कसे आहे याचे यथोचित वर्णन श्री गणपती अथर्वशीर्षात आहे. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बसवण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीही तशाच असायला हव्यात; मात्र प्रत्यक्षात असे घडताना दिसत नाही. हल्ली बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये श्री गणेशाच्या मूर्तीपेक्षा सजावटीला अधिक प्राधान्य दिले जात असल्याने त्यानुरूप विविध वेशभूषेतील मुर्त्या आणल्या जातात. मुंबईतील काही मंडळांत भव्य गणेशमूर्ती हेच गणेशभक्तांचे आकर्षण केंद्र असल्याने काहीतरी वेगळे करायचे म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपात आणि अन्य देवतांच्या, अवतारांच्या वेशभूषेत गणेशमूर्ती साकारल्या जातात. गणेशमूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये फेरफटका मारला असता यंदाही अनेक गणेशोत्सव मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज, भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, भगवान श्री शंकर, श्रीविष्णू, स्वामी समर्थ, साईबाबा आदींच्या वेशभूषेत गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी ऑर्डर्स दिल्या आहेत. सर्व देवता आणि अवतार हे भक्तांचे कल्याण आणि दृष्ट प्रवृत्तीचा संहार करणाऱ्याच असल्या तरी प्रत्येक देवतेचे कार्य वेगवेगळे आहे, तसे त्यांचे उत्सवही वेगवेगळे आहेत, कृष्णजन्माष्टमीला आपण श्री गणेशाची मूर्ती घरी आणत नाही किंवा श्री रामनवमीला श्री गणेशाची शोभायात्रा काढत नाही मग श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशाला विविध वेषभूषांत का दाखवतो ? हिंदू धर्मातील प्रत्येक देवतेला विशिष्ट आकार आणि विशिष्ट वेशभूषा आहेत. त्यातून सिद्ध होणाऱ्या प्रतिमेतून अथवा मूर्तीतून त्या त्या देवतेचे तत्व आणि चैतन्य प्रक्षेपित होते असे धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे मूर्तीला श्रीरामाच्या मूर्तीचा आकार दिला आणि शीर केवळ श्रीगणेशाचे लावले कि ती मूर्ती शत प्रतिशत श्रीगणेशाची होत नाही. कारण शरीराचे अन्य अवयव आणि वेशभूषा ही श्रीरामाचीच असणार आहे. त्यामुळे श्रीगणेशमूर्तीवर असे प्रयोग करणे योग्य नाही. स्वामी समर्थांचे काही भक्त घरी स्वामींच्या वेशभूषेतील गणपती आणतात. साईबाबांचे भक्त साईबाबांच्या वेशभूषेतील गणेशमूर्ती बनवून घेतात तर छत्रपती शिवरायांचे कट्टर शिवभक्त चक्क छत्रपती शिवरायांच्या वेशातील गणेशमूर्ती ऑर्डर करून बनवून घेतात. अशा प्रकारच्या गणेशमूर्ती गणेशचतुर्थीच्या दिनी घरी आणणाऱ्याचा त्या त्या संतांविषयी आणि महापुरुषांविषयी श्रद्धेचा भाग असला तरी अशा प्रकारे आपल्या प्रतिमेला विघ्नहर्त्या श्रीगणेशाच्या स्वरूपात दाखवणे स्वामींना किंवा छत्रपती शिवरायांना कधीतरी आवडले असते का, याचा विचार ही मंडळी का करत नाहीत.
घरातील बच्चे कंपनीवर कार्टून विश्वातील पात्र, सुपरमॅन, बॅटमॅन यांसारख्या व्यक्तीरेखा यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी या पात्रांच्या रूपात गणेशमूर्ती साकारण्याच्या ऑर्डर्स पालकांकडून दिल्या जातात. अशा काल्पनिक पात्रांच्या वेशात श्रीगणेशाला साकारणे हा श्रीगणेशाचा अवमान नव्हे का ? गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी आणल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीच्या माध्यमातून साक्षात श्रीगणेशच आपल्या घरी अवतरणार आहेत. जोपर्यंत ते आपल्या घरी विराजमान आहेत तोपर्यंत त्यांची आपल्याला मनोभावे सेवा करायची आहे हा भाव २४ तास जागृत राहण्यासाठी श्रीगणेशमूर्तीही शास्त्रात सांगितल्याप्रमाणे चौरंगावर किंवा आसनावर विराजमान असलेली हवी. वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या स्वरूपातील श्रीगणेशाला १० दिवस पुजून अनंत चतुर्दशीला या पुजलेल्या मूर्तीचे जेव्हा आपण विसर्जन करतो. तेव्हा हे विसर्जन नेमके श्री गणेशाच्या मूर्तीचे होते कि अन्य देवता, संत आणि महापुरुष यांच्या मूर्तींचे ? याचा विचार अशा मुर्त्या घरी आणणाऱ्यांनी करायला हवा. काही मंडळांमध्ये किंवा घरच्या सजावटींमध्ये श्री गणेशमूर्तीला चलचित्राच्या स्वरूपात दाखवले जाते, काही ठिकाणी पेटित पैसे टाकल्यावर श्रीगणेशमूर्ती उभी राहून पैसे टाकणाऱ्याला लाडूचा प्रसाद देतानाचे प्रयोजन केलेले असते. विविध धातूंच्या भांड्यांपासून, फळांपासून, सुक्यामेव्यापासून, चॉकलेटपासून गणेशमूर्त्या बनवल्या जातात. हासुद्धा श्रीगणेशाचा अवमानच आहे. गतवर्षी टिप्स भक्ती प्रेझेंट्सने गणेशचतुर्थीच्या निमित्ताने व्यसनाविषयी प्रबोधन करण्यासाठी एक विशेष गीत प्रसारित केले होते ज्यामध्ये श्री गणेशाला पोलिसांच्या वेशभूषेत दाखवण्यात आले होते. या गीतामध्ये बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांनी सहभाग घेतला होता. गीत सादर करण्याचा उद्देश जरी चांगला असला तरी श्री गणेशाला अशा प्रकारे पोलिसांच्या वेशात दाखवणे अयोग्यच आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान काही कंपन्या व्यावसायीक हेतूने श्रीगणेशाचा वापर आपल्या जाहिरातींमध्ये करतात. अशांवर गणेशाची कृपा होईल का ? आपल्याला पुरेसे धर्मशास्त्र ज्ञात नसल्याने धार्मिक सणांच्या आणि उत्सवांच्या बाबतीत ‘मला सर्व कळते’ या विचाराने आपण हवे तसे वागतो, हवे तसे करतो. धार्मिक सण शास्त्रीय दृष्ट्या कसे साजरे करावेत याबाबतचे सविस्तर लिखाण आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन धर्मग्रंथांत हजारो वर्षांपूर्वीच मांडून ठेवले आहे. ते तसे साजरे केल्याने मनुष्याला उचित लाभ होतो आणि आनंदही मिळतो. याउलट आपण आपल्याच मनाप्रमाणे कारण्याचा प्रयत्न केल्यास लाभ तर होणार नाही उलट हानीच होण्याचा अधिक संभव असतो.
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क करा. ९६६४५५९७८०