दापोली : विवाहित असल्याचे लपवून दापोलीतील एका तरुणाने २० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन सागर सुरेश जाधव (३२, रा. नवशी, ता. दापोली) याला अटक केली आहे. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सागर जाधव याचे लग्न झालेले असल्याची बाब या तरुणीपासून लपवून ठेवली होती. त्याने फोन करण्यासाठी या तरुणीचा मोबाइल मागून घेतला व तिच्या मोबाइलवर तिचे फोटो आपल्या मोबाइलवर घेतले. त्यानंतर तिच्याशी ओळख वाढवून तिच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सागरकडून ब्लॅकमेलला कंटाळून व घरच्यांच्या जीवाला सागर काही बरं-वाईट करेल,
अशी भीती वाटल्याने ही तरुणी त्याच्याबरोबर पळून जायला तयार झाली. ते मुंबईला पळून गेले. मुंबईतील ज्या फ्लॅटमध्ये ते थांबले होते त्या फ्लॅटच्या मालकाला ते अविवाहित असल्याचे समजताच फ्लॅट रिकामा करण्यास सांगितले. त्यानंतर सागरने आताच लग्न करायचे आहे. तू नाही बोललीस तर तुझे फोटो, व्हिडीओ व्हायरल करेन व तुला बदनाम करेन, अशी धमकी देत लग्न केले.
२४ ऑगस्टला खेड येथे रेल्वेने घेऊन आला. त्यावेळी त्याने आपले ८ वर्षांपूर्वी लग्न झाले असून, पत्नीला सोडू शकत नाही. तू तुझ्या घरी जा, मी माझ्या बायकोसोबत घरी राहणार आहे, असे तरुणीला सांगितले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने दापोली पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार सागर जाधवला पोलिसांनी अटक केली आहे.