केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्याचाही उल्लेख करत कलम ३७०चा इतिहास जमा झाले असून, आता कधीही परत येऊ शकणार नाही आणि आम्ही ते परत येऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितले.
पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शहा म्हणाले की, ‘सुरुवातीपासूनच जम्मू-काश्मीर आमच्या पक्षासाठी खूप महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून राज्याला भारताशी जोडण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. आधी भारतीय जनसंघ आणि नंतर भाजपाने जम्मू-काश्मीरसाठी संघर्ष केला. २०१४ पर्यंत जम्मू-काश्मीर नेहमीच फुटीरतावाद व दहशतवादाच्या छायेत होता. जम्मू-काश्मीरचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा २०१४ ते २०२४ सुवर्णमय असेल. यापूर्वीची कलम ३७०च्या छायेखाली सरकार फुटीरतावाद्यांच्या मागण्यांपुढे झुकत असतं, पण आता असे होत नाही,’ असे शहा म्हणाले. ‘मी नॅशनल कॉन्फरन्सचा अजेंडा वाचला. खेदाची बाब आहे की, काँग्रेसने या अजेंड्याला मूक पाठिंबा दिला आहे. ओमर अब्दुल्ला यांना सांगायचे आहे की, आम्ही तुम्हाला गुज्जर बकरवाल आणि डोंगराळ भागात राहणाऱ्यांच्या आरक्षणाला हात लावू देणार नाही. कलम ३७० मुळे पूर्वी गुजर बकरवाल यांना आरक्षण मिळत नव्हते, ते आता मिळणार असल्याचे शहा म्हणाले.