पुणे : मुळशी तालुक्यामध्ये बदलापूरसारखा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका नराधम शिक्षकानेच शाळेतील तब्बल १९ विद्यार्थिनींचा विनयभंग केला. ५४ वर्षीय शिक्षक जालिंदर नामदेव कांबळे (रा. लोणीकाळभोर, पुणे) याला अटक करण्यात आली.
मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील जिल्हा विद्या विकास मंडळ संस्थेच्या शाळेमध्ये जालिंदर नामदेव कांबळे हा विद्यार्थिनींना मारहाण करून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलतो व शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करतो, अशी तक्रार एका मुलीने शाळेच्या व्यवस्थापनाकडे केली होती. त्यानुसार ५ सप्टेंबर रोजी संस्थेच्या कार्यकारिणी समितीने याची चौकशी केली तेव्हा तब्बल १९ विद्यार्थिनींनी लेखी तक्रारी केल्या होत्या.