मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळामुळे कर्नाटकात उसाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे यंदाचा साखर हंगाम १५ नोव्हेंबर नंतरच सुरू करावा, असे आदेश कर्नाटक सरकारने कारखान्यांना दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या अगोदर हंगाम सुरू होऊन उसाची होणारी पळवापळवी थांबणार असल्याने सीमाभागातील साखर कारखान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कर्नाटकातील विशेषतः उत्तर भागातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ ऑक्टोबरपासूनच सुरू होतो. महाराष्ट्राच्या अगोदर साधारणतः महिनाभर हंगाम सुरू झाल्याने सीमाभागातील उसाची पळवापळवी होते. मात्र, गेल्यावर्षी महाराष्ट्र व कर्नाटकात पाऊस कमी झाल्याने काही तालुक्यांत उसाची लागवड कमी झाली. त्याचा परिणाम यंदाच्या हंगामावर होणार आहे. उसाची उपलब्धता कमी असल्याने यंदा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कमी कालावधीच्या उसात पाण्याचे प्रमाण खूप असते.परिपक्च उसाचे गाळप केल्यास शेतकऱ्यांना वजनही चांगले मिळते.साखर उतारा चांगला मिळाल्याने कारखान्यांचाही फायदा होतो.साधारणतः १३ ते १४ महिन्यांच्या उसाचे गाळप शेतकरी व कारखान्यांच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.