ऑगस्ट महिन्यात एसटी करोडपती झाली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १६ कोटी, ८७ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. २०१५ नंतर नऊ वर्षांनंतर महामंडळ प्रथमच नफ्यात आले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये एसटी महामंडळ फायद्यात होते. या नफ्यात कोल्हापूर आगाराचा मोठा वाटा आहे. कोल्हापूर विभागाने २ कोटी, १६ लाख रुपये नफा मिळविला आहे.महामंडळाने ऑगस्ट २०२४ मध्ये राज्यस्तरावर १६ कोटी, ८७ लाख रुपयांचा नफा मिळविला. त्यामध्ये कोल्हापूर विभागाने २ कोटी १६ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. एसटीने ७० लाख किलोमीटरची वाहतूक केली असून ८२ लाख प्रवाशांना वाहून नेले आहे.
कोल्हापूर विभागात सरासरी ७० लाख प्रवाशांची वाहतूक झाली.एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे, हे मोठे आव्हान होते. त्या वेळी राज्य सरकारने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास, सर्व महिलांना प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत दिल्याने प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले.
गेली कित्येक वर्षे तोट्यात असलेल्या विभागांना मार्गदर्शनासाठी पुणे मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेतल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून प्रवासी जास्त आहेत तेथे वळविल्या.