निवडणूक जशी जवळ येते तसे स्थानिक समस्यांविरुद्धच्या आंदोलनांची संख्या वाढू लागते. कारण जनतेलाही आपल्या समस्यांसाठी निवडणुकीत उभ्या असलेल्या लोकप्रतिनिधीवर दबाव वाढवावा लागतो. एकदा लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा लोकांचा समज आहे.
काही धोरणात्मक समस्या असेल आणि सरकारच त्याचा न्यायनिवाडा करू शकत असेल तर शहरातील संविधान चौकात धरणे आंदोलन केले जाते; पण समस्या नागरी असेल तर महापालिकेचे मुख्यालय, झोन कार्यालय, वस्त्यांमध्ये, समस्येच्या स्थळी लोकं आंदोलन करतात. संविधान चौकात, व्हेरायटी चौकात होणाऱ्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी घ्यावी लागते; पण लोकल समस्यांसाठी राजकीय पक्षांच्या, संघटनेच्या नावाने आंदोलन, धरणे, उपोषण केले जाते.
रस्ते, गडरची समस्या शहरांमध्ये सर्वाधिक समस्या रस्त्यांच्या आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यामुळे वाहनचालकांना होणारा त्रास यामुळे लोकं त्रस्त आहेत. शहराच्या आऊटरच्या भागांमध्ये कच्चे रस्ते असल्याने पावसाळ्यात त्रास होतो. अनेक नवीन लेआऊटमध्ये रस्ते नाहीत. शहरातील जुन्या वस्त्यांमध्ये गडरलाईनच्या समस्या उद्भवल्या आहे, गडरलाईन जीर्ण झाल्याने वस्त्यांमध्ये घाण पसरली आहे. उप्पलवाडी परिसरातील सर्वच वसाहतींमध्ये रस्त्यांची प्रचंड दुर्दशा असून, कच्च्या रस्त्यांवर पाणी साचून चिखल होत असल्याने लोकांनी रस्त्यावर उभे राहून मानवी श्रृंखला तयार करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.





