सार्वजनिक ठिकाणी,अपार्टमेंटच्या पार्किंगमधून तसेच घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. कोणतीही दुचाकी असो हॅण्डल लॉकला हिसडा मारून ते सहज तोडले जाते. त्यानंतर बनावट चावीने वाहन पळवून नेले जाते. दररोज एक ते दोन दुचाकी चोरीस जातात असे जिल्ह्यातील चित्र आहे.
सध्या बाजारात दुचाकीच्या किमती वाढल्या आहेत. कमीत कमी लाखाच्या आसपास किमती असून त्यापुढे लाखाहून अधिक किमती आहेत. त्यामुळे नवीन दुचाकी घेताना अनेकांना अर्थसहाय घ्यावे लागते. नवीन घेतलेली दुचाकी चोरीस गेल्यास विमा असल्यास दुसरी दुचाकी मिळते. परंतु विमा मुदत संपलेली दुचाकी चोरीस गेल्यानंतर फटका सहन करावा लागतो. सध्या दुचाकी चोरट्यांच्या वेगवेगळ्या टोळ्या चोरीचे उद्योग करतात.
सांगली जिल्ह्यात दररोज एक ते दोन दुचाकी चोरीस जातात. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्रथम कच्ची नोंद होते. आठवडाभर कोठे दुचाकी मिळते का बघून पक्की फिर्याद नोंदवली जाते. त्यानंतर तपास सुरू होतो. चोरीस गेलेल्या दुचाकी आणि पोलिसांकडून जप्त दुचाकी यामध्ये तफावत असते.सध्या बाजारात दुचाकीच्या किमती वाढल्यामुळे चोरटे चोरीच्या दुचाकी परराज्यात किंवा सीमा भागात २० ते २५ हजाराला विना कागदपत्रे विकून मोकळे होतात. चोरीची दुचाकी घेणारे बरेचजण शेती कामासाठी किंवा गावातच कामासाठी अशा दुचाकी वापरतात.