लोकसभा निवडणुकीत ‘दुष्काळी फोरम’ने ताकद दाखवली. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या फोरमचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची सोमवारी सांगलीत बंद खोलीत चर्चा झाली. ३ ऑक्टोबरनंतर पुन्हा व्यापक बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीतही उतरण्याचे संकेत मिळत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना गती आली आहे.महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटकपक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, ‘दुष्काळी फोरम’ ही सक्रिय झाला आहे. सोमवारी सांगलीत विश्रामबाग येथे महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या विभागीय कार्यालयात दुष्काळी फोरमचे तीन नेते एकत्र आले. लोकसभा निवडणुकीत भाजपचा राजीनामा दिलेले माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पृथ्वीराज देशमुख यांची गोपनीय बैठक झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याने राजकीय गोटात पडसाद उमटत आहेत.
लोकसभा निवडणुकीत दुष्काळी फोरमने अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पारड्यात वजन टाकले होते. जगताप, घोरपडे यांनी उघडपणे विशाल पाटील यांचा प्रचार केला, तर देशमुख यांची व्हायरल ऑडिओ क्लिप बरीच गाजली. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नेते पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. ज्या-त्या तालुक्यात दुष्काळी फोरममधील नेत्यांच्या सोयीचे राजकारण करायचे, असे या बैठकीत ठरल्याचे वृत्त आहे. अन्य काही वजनदार नेतेही जगताप, घोरपडे, देशमुख यांच्या संपर्कात आहेत. दुष्काळी फोरमची पुढील बैठक ३ ऑक्टोबरनंतर होणार आहे. त्या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा व निर्णय होणार असल्याचे वृत्त आहे.