जत : बसर्गी (ता. जत) येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. गेटचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
त्याचबरोबर गावातील बंद असलेल्या सहा घरांत चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. ही घटना शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. याबाबत शाखाधिकारी भानुदास रामराव दुधाळ यांनी जत पोलिसांत फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, बसर्गी येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बँक बंद करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी बँकेचे गेट तोडलेले दिसल्याने ग्रामस्थांनी याबाबतची माहिती जत मार्केट यार्ड शाखेस दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी पंचनामा केला. यामध्ये कोणतीही रोकड किंवा ऐवज चोरीस गेला नाही. तसेच गावातीलच सहा घरांतील किरकोळ वस्तू विस्कटलेल्या दिसून आल्या आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांनी या घटनेचा कसून तपास करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. या घटनेचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल मुल्ला करीत आहेत.