पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील यांची माहिती
तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत मंडल अधिकारी वैशाली प्रवीण वाले, कोतवाल प्रदीप प्रकाश माने व खाजगी इसम दत्तात्रय उर्फ संभाजी बाबर या तिघांचा समावेश असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील यांनी दिली.
बस्तवडे येथील एका व्यक्तीची मंडल अधिकारी वैशाली वाले यांच्यासमोर तक्रारीबाबत सुनावणी सुरू होती. या तक्रारीचा निकाल संबंधिताच्या बाजूने लावून तशी नोंद घालून देण्यासाठी वाले यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. बस्तवडे येथील तलाठी कार्यालयातील खाजगी इसम दत्तात्रय उर्फ संभाजी बाबर यांच्या मार्फत ही मागणी केली होती.
याबाबत संबंधित तक्रारदाराने सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या पडताळणीवेळी वैशाली वाले यांनी वायफळे येथील तलाठी कार्यालयातील कोतवाल प्रदीप माने यांच्या मार्फत संबंधित व्यक्तीकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील यांनी रात्री उशिरा दिली.