महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील हुलजंती येथील महालिंगराया देवाची यात्रा लाखों भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी पुजाऱ्यांच्या भाकणूकीत ज्वारी, गव्हाचं चांगलं पीक असेल, पौर्णिमेच्या आत पाऊस पडेल,पुढचं साल चांगलं आहे.
बैलासाठी चांगले दिवस येतील’,असे महालिंगराया पालखी भेट सोहळ्याप्रसंगी पुजाऱ्याने वर्तवली. हुलजंती (ता. मंगळवेढा) येथे लाखो भाविकांच्या गर्दीत हा सोहळा झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हुलजंती येथे गुरू बिरोबा व शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात झाला.
दररोज लाखोंच्या संख्येने भाविक श्री क्षेत्र हुलजंती येथे दाखल झाले. शुक्रवारी पहाटेपासून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंडासचे (ध्वज) दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
तसेच बिरोबा महालिंगराया या गुरू शिष्यांच्या पालखी भेट सोहळ्यासाठी मंदिराच्या बाजूने वाहत असलेल्या ओढ्यात लाखो भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी ढोल, कैताळ, नगाऱ्याच्या गजरात सोहळा झाला.सात पालख्यांचा भेटीचा मान या गुरू-शिष्यांच्या नयनरम्य भेट सोहळ्याअगोदर सात पालख्यांचा भेटीचा मान आहे.
सोन्याळ (ता. जत) येथील विठुराया, उटगी येथील भरमदेव, शिरढोण येथील बिरोबा यासह अन्य देवांच्या पालख्यांचा भेट सोहळा होतो. गुरू-शिष्य भेटीचा हा अनोखा सोहळा अनुभवण्यासाठी कन्नड, मराठी, तेलगू भाषिक लोक हुलजंती येथे लाखोंच्या संख्येने एकत्र आले होते.