सेम नावाच्या उमेदवारांचा‌ बसणार दणका | नेमके कोणत्या मतदारासंघांत एक सारख्या नावाचे उमेदवार ?

0
151

विधानसभा निवडणूक जोर धरत असतानाच निवडणुकांमध्ये जिंकण्याबरोबरच पाडापाडीसाठीही  चाली खेळल्या जात आहेत.त्यासाठी अनेक प्रयोग होतातच,त्यातच काटावर विजय होऊ शकणाऱ्या उमेदवारांना पाडण्यासाठी सेम नावाच्या उमेदवारांना उभे करण्याचे प्रयोग घडविले जात आहेत.यात डमी उमेदवाराला पाच दहा हजार मताची बेगमी व्हावी असे नियोजन असते.

त्यामुळे मुख्य उमेदवाराला त्यांचा फटका बसून त्याचा गेम करण्याचा प्रयोग केला जात आहे. त्यातील एकाच नावाच्या दोन किंवा जास्त व्यक्तींना रिंगणात उतरविण्याचा डाव अनेक वर्षांपासून ‘फेमस’ आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तासगावसह पाच मतदारसंघांत प्रमुख उमेदवारांच्या नावाचे ‘डमी’ उमेदवारही रिंगणात दिसत आहे.

आमचे नाव ‘सेम’ आणि आम्ही करणार ‘गेम’ असाच काहींचा डाव दिसतो. त्यामुळे प्रमुख उमेदवारांना ‘तो मी नव्हे’ याचाही प्रचार करून स्वतःचे पूर्ण नाव, चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कसरत करावी लागेल.

मतदान केंद्रावर गेल्यानंतर काही मतदार गोंधळतात. काहीजण नाव वाचून चिन्ह न पाहता यंत्रावरील बटण दाबतात. काहीजण केवळ चिन्ह पाहून मतदान करतात. तर सुज्ञ मतदार नाव, चिन्ह पाहूनच मतदान करतात. गोंधळात पडणाऱ्या मतदारांच्या मताचा फायदा प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडण्यासाठी व्हावा यासाठी ‘ डमी’ उमेदवार उभा करण्याची खेळी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दिसून आली आहे.

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित रावसाहेब पाटील यांच्या नावाचे तीन ‘डमी’ उमेदवारही रिंगणात आहेत. रोहित रावसाहेब पाटील, रोहित राजगोंडा पाटील, रोहित राजेंद्र पाटील अशी ‘सेम’ नावे आहेत. सांगलीत काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील यांच्यासह जयश्री (वहिनी) जगन्नाथ पाटील, जयश्रीताई पाटील या नावाने दोघी महिलांनीही अर्ज भरला आहे. एकाच नावाच्या तीन महिला उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. माघारीनंतर येथे चित्र स्पष्ट होईल.

इस्लामपूरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत राजाराम पाटील उमेदवार आहेत. येथे जयंत रामचंद्र पाटील या नावाने अर्ज दाखल आहे. येथे राष्ट्रवादीकडून निशिकांत प्रकाश पाटील हे रिंगणात आहेत. तसेच याठिकाणी निशिकांत प्रल्हाद पाटील, निशिकांत दिलीप पाटील या नावाने दोन अर्ज दाखल आहेत.शिराळा मतदार संघात आमदार मानसिंग फत्तेसिंगराव नाईक हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढत आहेत.

त्यांच्याविरुद्ध भाजपकडून सत्यजित देशमुख लढत देत आहेत. याठिकाणी मानसिंग ईश्वरा नाईक या नावाने उमेदवारी अर्ज दाखल आहे. खानापूर मतदारसंघात शिवसेनेकडून सुहास बाबर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वैभव पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या मतदारसंघातही वैभव प्रतापराव पाटील आणि सुहासभय्या राजेंद्रभाऊ बाबर असे ‘सेम’ नावाचे अर्ज दाखल केले आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here