तासगाव येथील साठेनगर भागात पैसे व दिवाळीच्या फराळ वाटप करतात करत असताना सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील यांना रविवारी सायंकाळी पकडण्यात आले होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यासाठी ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप संजय पाटील समर्थकांनी केला होता. दरम्यान, या प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट आला आहे. हे पैसे दुधाचे होते. शिवाय भाऊबिजेनंतर साठेनगर भागात मी दिवाळीचा फराळ द्यायला गेलो होतो, असा जबाब सचिन पाटील यांनी पोलिसांसमोर दिला आहे.
तासगाव - कवठेमहांकाळची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय पाटील यांच्यामध्ये होत आहे. अतिशय अटीतटीच्या या लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही गटांकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून दोन्हीही उमेदवार आपापला प्रचार करीत आहेत.
निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये. पैशांचे वाटप होऊ नये, यासाठी दोन्ही गट एकमेकांवर 'वॉच' ठेवून आहेत. एकमेकांच्या प्रत्येक हालचालीवर 'करडी' नजर ठेवण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी साठेनगर भागात सचिन पाटील व खंडू कदम हे दोघेजण दिवाळीचा फराळ व प्रत्येक कुटुंबामध्ये तीन हजार रुपयांचे पाकीट देत असल्याची माहिती संजय पाटील समर्थकांना मिळाली.
त्यानंतर संजय पाटील समर्थकांनी साठेनगर येथे धाव घेतली. त्यावेळी खंडू कदम हा तेथून पळून गेला. तर सचिन पाटील याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तत्पूर्वी संजय पाटील समर्थकांनी सचिन पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. हे पैसे कुठून आणले. ते कशासाठी वाटले जात होते, असे अनेक प्रश्न विचारले गेले. यावेळी सचिन पाटील यांनी हे पैसे खंडू कदम यांनी आणले आहेत व ते रोहित पाटील यांच्या प्रचारासाठी वाटप करत आहोत, असे स्पष्टपणे व्हिडिओमध्ये सांगितले.
त्यामुळे रोहित पाटील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले. रोहित पाटील हे पैसे देऊन मते विकत घेत असल्याचा आरोप संजय पाटील समर्थकांनी केला. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली. रोहित पाटील यांनी मात्र मला जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र रचले जात आहे. आर. आर. पाटील हयात असताना त्यांनाही विरोधकांनी अशाच प्रकारे त्रास दिला होता. विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता, असा पलटवार केला. तर गेल्या चार दिवसांपूर्वी मतदारसंघांमध्ये विरोधकांनी फराळ वाटला असल्याचा घणाघात केला.
दरम्यान सचिन पाटील व खंडू कदम यांच्याकडून पोलिसांनी 1 लाख 3 हजार 500 रुपये जप्त केले. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना आज तासगाव पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आले होते. यामधील सचिन पाटील यांनी पोलिसांसमोर जबाब दिला. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सदरचे पैसे हे माझ्याकडे दूध बिलाचे आले होते. तर साठेनगर भागातील अनेक लोक आमच्या शेतात मजुरीसाठी येतात. भाऊबीजेनंतर त्यांना मी दिवाळी द्यायला गेलो होतो. त्यामुळे माझ्यासोबत दिवाळीचा फराळ होता.
सचिन पाटील यांच्या या जबाबामुळे रविवारी सायंकाळी घडलेल्या पैसे वाटप प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. हे नेमके पैसे कोणाचे होते, यावरून आता तर तर्कवितर्क लढवले जात आहेत. रोहित पाटील यांनी कालच संबंधितावर दबाव टाकून व्हिडिओ तयार केला आहे. माझे नाव घ्यायला भाग पाडले आहे, असा आरोप केला होता. दरम्यान पोलिसांनी सचिन पाटील यांना अनेक प्रतिप्रश्न केले आहेत, असे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सांगितले.